वाढदिवसाचा अनोखा संकल्प! हरीश देशमुख यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

अमळनेर (प्रतिनिधी) वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावत हरीश देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपली. दोन विद्यार्थ्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च स्वीकारण्यासह एकल पालकत्व असलेल्या १५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांनी वाढदिवसाला सेवाभावी उपक्रमाची जोड दिली.

या उपक्रमांतर्गत एफ. एम. ललवानी हायस्कूल, बेटावद येथील दोन होतकरू विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षभराचा शैक्षणिक खर्च स्वीकारण्यात आला. तसेच विमलबाई पाटील प्राथमिक विद्यालयातील एकल पालकत्व असलेल्या १५ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत, त्यांच्या स्वप्नांना बळ मिळावे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

“माणूस जन्माला कसा येतो, यापेक्षा तो कसा जगतो आणि जगताना समाजाला काय देतो, हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे असते,” या विचारातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. स्वतःच्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेत गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या प्रसंगी एफ. एम. ललवानी हायस्कूलचे प्राचार्य डी. जी. पवार, विमलबाई पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यू. के. पाटील, उपमुख्याध्यापक ए. पी. कढरे, पर्यवेक्षक पी. व्ही. माळी, शिशुवर्गाच्या मुख्याध्यापिका धनश्री कोठावदे आणि सूत्रसंचालक एस. पी. पाटील उपस्थित होते. तसेच दिनेश पवार, मयूर पाटील, राहुल चौधरी, विजेंद्र शिरसाळे यांच्यासह युवाभारत ग्रुपचे सदस्य आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. “वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद म्हणजे आपल्या आनंदातून इतरांच्या आयुष्यात आनंद फुलवणे,” या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम शिक्षणाप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *