
सागर कोळीची दोन वर्षांची हद्दपारी कायम; आयुक्त प्रवीण गेडाम यांनी अपील फेटाळले
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडळ येथील सागर अशोक कोळी याला जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सागर अशोक कोळी याचे अपील फेटाळल्याने हद्दपारीच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले आहे.
९
याबाबत अधिक माहिती अशी की, मांडळ येथील सागर अशोक कोळी याच्याविरुद्ध खून, गौण खनिज चोरी आणि खुनाचा प्रयत्न असे विविध गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याच्या कारणावरून मारवड पोलीस ठाण्यामार्फत त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांनी सुनावणी घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर सागर अशोक कोळी याला जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरुद्ध सागर अशोक कोळी याने नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सुनावणी घेतली. सागर अशोक कोळी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याची अटी व शर्तींवर जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतरही गौण खनिज चोरी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची प्रकरणे समोर आल्याचे सुनावणीदरम्यान मांडण्यात आले. या पार्श्वभूमीवर सागर अशोक कोळी याला हद्दपार ठेवण्याची बाजू मांडण्यात आली. त्यानंतर आयुक्त प्रवीण गेडाम यांनी उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे यांचा हद्दपारीचा निर्णय कायम ठेवत सागर अशोक कोळी याचे अपील फेटाळले.

Leave a Reply