
वीज मंडळाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान! वावडे-लोणे येथे शॉर्ट सर्किटने शेत जळाले
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वावडे व लोणे शिवारात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचा मका, ज्वारी चारा जळून सुमारे २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वावडे येथील उशाबाई दिलीप पाटील यांच्या मांडळ शिवारातील गट क्र. २६७ व २६८ मध्ये शेती असून शेजारील शेतात डीपी आहे. दि. २० रोजी दुपारी डीपीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन शेतातील चाऱ्याला आग लागली. ही आग वेगाने पसरून उशाबाई पाटील यांच्या शेतात शिरली. गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत सुमारे चार बिघे ज्वारी चारा, कणसे तसेच १० पाईप जळून खाक झाले. या घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दुसरी घटना दि. १८ एप्रिल रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास लोणे शिवारात घडली. येथील उशाबाई अरुण पाटील यांच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यात शेतात काढून ठेवलेला ५० हजार रुपयांचा मका तसेच ३० हजार रुपयांच्या ठिबक नळ्या जळून एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, दोन्ही घटना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याने संबंधित शेतकऱ्यांना वीज मंडळाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply