वैशाख पौर्णिमेला आज संत सखाराम महाराज पालखी उत्सव होणार साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुख्मिणी संस्थानचा पालखी उत्सव सोहळा आज दि. १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. संत सखाराम महाराज यात्रा उत्सवातील हा सर्वात मोठा व प्रमुख सोहळा मानला जात असल्याने भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

सकाळी ६ वाजता वाडी संस्थानातून पालखी मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. आकर्षक सजावट केलेल्या पालखीत हातात धनुष्यबाण घेतलेली लालजीची मूर्ती विराजमान असणार आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. पालखीच्या मागे प. पू. संत प्रसाद महाराज अनवाणी पायी चालत भाविकांना दर्शन व प्रसाद देत असतात. मिरवणुकीदरम्यान पान-सुपारी निमित्त महाराज अनेकांच्या घरी भेटी देतात. मिरवणुकीसोबत निशाणाचे घोडेस्वार, भालदार-चोपदार यांचा मोठा लवाजमा असतो. पालखीच्या पुढे शहरातील विविध व्यायामशाळा, लेझीम मंडळे, तसेच विविध पथके आपली कला सादर करतात. ढोल पथके आणि भुसावळ येथील रेल्वेचा बँड हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असते. याशिवाय मृदंगवादक व भजनी मंडळांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो.

ही पालखी म्हणजे पंढरीच्या विठ्ठल-रुक्मिणींच्या मिरवणुकीचे प्रतीक मानली जात असल्याने या सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मार्गात विविध सामाजिक संस्था व मंडळांकडून पाणी व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. सराफ बाजार, फरशी पूल, पैलाड मार्गे सायंकाळी पालखी पुन्हा वाडी संस्थानात दाखल होणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *