गांधीनगरातील उघडी गटार ठरतेय मृत्यूचा सापळा; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील नवीन बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या गांधीनगर परिसरात अर्धवट अवस्थेत सोडलेली उघडी गटार आज नागरिकांसाठी गंभीर धोका बनली आहे. पालिकेच्या निष्काळजीपणामुळे हे बांधकाम अपूर्णच राहिले असून, दिवसेंदिवस ही गटार अधिकच रुंद होत चालली आहे. या प्रकरणी गांधीनगरातील रहिवासी नाहिद शे. रहीम तेली यांच्यासह त्रस्त नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने गटारीचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बस स्थानकाच्या शेजारी, गांधीनगर रस्त्यालगत डाव्या बाजूस सुरू असलेले गटारीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबवण्यात आले असून के. आर. ट्रेडिंगपर्यंतचा भाग अद्याप अपूर्ण आहे. या उघड्या गटारीत घाण साचून भीषण दुर्गंधी पसरली असून साथीचे आजार पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्यालगत असलेल्या दुकानदारांना या दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा दररोज सामना करावा लागत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. शाळा, दवाखाने, बाजारपेठ येथे ये-जा करणाऱ्या महिला, लहान मुले, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ही उघडी गटार जीवघेणी ठरत आहे. अपघाताची दाट शक्यता असतानाही पालिकेकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.

नुकतेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला असताना, गांधीनगर रस्त्यालगतच्या वस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ आश्वासनांवर वेळ न घालवता तातडीने गटारीचे बांधकाम पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *