
स्वातंत्र्य दिनी अमळनेरात दृष्टिदिव्यांग कलाकारांची भव्य चॅरिटी संगीत मैफल
अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनानिमित्त दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि अंध बांधवांच्या कल्याणासाठी समाजाने एक पाऊल पुढे टाकावे, या उद्देशाने अंधजन कल्याण मंडळाच्या वतीने भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. “एक पाऊल टाकूयात अंध बंधवांच्या मदतीसाठी…” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृह, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे.
या संगीत मैफिलीचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमात सहभागी होणारे सर्व कलाकार हे दृष्टिदिव्यांग असून शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आपल्या अंध बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी स्वखुशीने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. सप्तस्वरांजली म्युझिकल ग्रुपच्या वतीने देशभक्तीपर, मराठी, हिंदी तसेच अहिराणी सदाबहार गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. “समन्वयातून करूया दृष्टीदिव्यांगांचा उत्कर्ष” या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कला आणि कौशल्याला प्रोत्साहन देणे, स्वयोरोजगार करणाऱ्या अंध व्यक्तींच्या स्वावलंबनाला चालना देणे आणि त्यांच्यासाठी सामाजिक आधार निर्माण करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमातून प्राप्त होणारा निधी दृष्टिदिव्यांग बांधवांचे शिक्षण, आरोग्य, स्वयोरोजगार, कौशल्य विकास तसेच विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात सर्व नागरिक, उद्योजक, व्यापारी, विविध संस्था तसेच दानशूर व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन अंधजन कल्याण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. चॅरिटी शोचे तिकीट शुल्क केवळ १०० रुपये ठेवण्यात आले असून नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी चंद्रकांत मैलागीर यांच्याशी ९८२४८०८८२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply