
अमळनेर तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक; ‘सेवा संकल्प अभियान’ला मिळणार गती
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींवर पुन्हा अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शासनाच्या १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ाचा मार्ग मोकळा झाला आहे. नियुक्त प्रशासक सरपंच म्हणून ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळणार असून, या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध उपक्रमांना गती देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या सप्ताहात सुशासन आणि नागरी सेवा देण्यावर भर राहणार आहे. यामध्ये जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी, आयुष्मान भारत कार्ड, विविध दाखले तसेच दिव्यांग प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दुसऱ्या सप्ताहात संस्था आणि सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी आदी ठिकाणी आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, परसबाग आणि संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे. तिसऱ्या सप्ताहात जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जलस्रोतांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती, जलसंधारणाची कामे तसेच पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या देण्यावर भर दिला जाणार आहे. चौथ्या सप्ताहात आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण आणि उपजीविका या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. यामध्ये आरोग्य शिबिरे, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती तसेच महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याच्या उपक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक सप्ताहात एक दिवस सक्तीने लोकसहभागातून श्रमदान घेण्याच्या सूचना असून, हे श्रमदान केवळ नावापुरते न ठेवता गावात किमान एक ठोस आणि शाश्वत बदल घडवून आणण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिर, वंचित मुलांना शिक्षणासाठी मदत, ‘फिट इंडिया’ खेळ सत्र, मतदान जागृती, वीरगाथा आणि सैनिकांचा सन्मान असे विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाल्याने ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण जनतेला विविध सुविधा उपलब्ध करून देता येतील तसेच त्यांच्या अडचणी तातडीने सोडविता येतील. विविध दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना गावपातळीवर मिळवून देण्यासही मदत होणार आहे, असे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पंचायत समिती अमळनेर यांनी सांगितले. तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींपैकी १५ गावांमध्ये केंद्रप्रमुख म्हणजेच शिक्षक प्रशासक म्हणून सरपंचाचे अधिकार सांभाळणार आहेत, तर आठ गावांमध्ये पर्यवेक्षिका प्रशासक म्हणून ग्रामपंचायतींचा कारभार पाहणार आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Reply