९० टक्के काम पूर्ण, तरी रस्ते बंदच! रखडलेल्या डीपी रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि भविष्यातील वाढत्या रहदारीचा विचार करून उभारण्यात आलेले विविध डीपी रस्ते आजही अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक रस्त्यांचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असले तरी जोडरस्ते आणि काही महत्त्वाचे तुकडे अपूर्ण राहिल्याने हे रस्ते अद्याप पूर्ण क्षमतेने वापरासाठी खुले झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी आणि प्रशासनाने तातडीने उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गेल्या वर्षभरापासून ८० फुटी डीपी रस्ता तसेच धुळे रस्ता ते पिंपळे रस्ता जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे काम सुरू असून त्यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र विविध रस्त्यांना जोडणारे शेवटचे टप्पे अद्याप अपूर्ण असल्याने या मार्गांवरून नियमित वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. पिंपळे रस्ता ते ढेकू रस्ता दरम्यान ८० फुटी रस्त्याचा सुमारे १५० फूट भाग अपूर्ण आहे. या धोकादायक स्थितीमुळे नुकताच एका पोलीस कर्मचाऱ्याचा मोटारसायकल घसरून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गलवाडे रस्त्याला जोडणारा तुकडादेखील अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक ठिकाणी केवळ किरकोळ कामे शिल्लक असून ती पूर्ण झाल्यास वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळू शकतो. रस्त्यालगतच्या गटारींची कामे नंतर झाली तरी चालतील; मात्र जोडरस्ते तातडीने पूर्ण केल्यास सुरक्षित वाहतूक सुरू होऊन शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. लक्झरी बस स्टॉप परिसरातही सुमारे ५० ते ६० फूट रस्त्याचे काम रखडले आहे. शेतकी संघाच्या जागेतून रस्ता देण्यास नकार असल्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे हा मार्ग धुळे रस्त्याला जोडून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, विप्रो कंपनीकडे जाण्यासाठी बोरी नदी पुलाखालून डीपी रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र रेल्वेकडून मंजुरी न मिळाल्याने या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता हा रस्ता सानेनगर परिसरातून नेण्याचा पर्याय पुढे आला असून त्याबाबत पुढील कार्यवाही अपेक्षित आहे. गांधलीपुरा पुलाचे बांधकाम होऊन तब्बल आठ वर्षांचा कालावधी लोटला असला तरी जोडरस्ता नसल्याने पुलावरील वाहतूक आजही सुरू झालेली नाही. या कामासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूसंपादन आणि जोडरस्त्याचा प्रश्न दीर्घकाळ जिल्हाधिकारी स्तरावर प्रलंबित होता. नुकताच या संदर्भातील निर्णय झाल्याने रस्त्याच्या कामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. प्रशासनाने याचा पाठपुरावा केल्यास हा मार्गही लवकरच वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.

शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डीपी रस्त्यांचा नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून हे मार्ग वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *