अमळनेर-जळोद ‘स्पेशल’ बस सकाळी ८ वाजता सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव-गांधली येथील विद्यार्थी व ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन अमळनेर ते जळोद मार्गे सकाळी ८ वाजता ‘स्पेशल’ बस सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबत निवेदन देण्यात आले असून मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) यांनी सांगितले की, सध्या लासूर बस अमळगाव-गांधली येथे थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. विशेषतः परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय ग्रामस्थांनाही दळणवळणाच्या सोयीअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अमळनेर ते जळोद बस अमळगाव-गांधली मार्गे सकाळी ८ वाजता सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर उपाध्यक्ष महेश सुतार, तालुका उपाध्यक्ष निलेश चौधरी, तालुका सचिव निलेश भावसार, शहर उपाध्यक्ष आदित्य दोरकर, जय बोरसे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *