
ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; पुढील टप्प्यात ५० विद्यार्थ्यांना घेणार दत्तक
अमळनेर (प्रतिनिधी) : आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनतर्फे ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये जाऊन गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून, आतापर्यंत तब्बल १,००० विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.
शैक्षणिक साहित्याच्या मदतीपुरते हे अभियान मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे, हा ज्ञानदीप अभियानाचा व्यापक उद्देश आहे. आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक साधने मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला आधार मिळत आहे. ज्ञानदीप अभियानाला दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनने पुढील टप्प्यात अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेनुसार त्यांना आवश्यक ते सहकार्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्य वाटपापासून सुरू झालेला हा उपक्रम आता विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणाला आधार देणाऱ्या दीर्घकालीन उपक्रमाच्या दिशेने वाटचाल करणार आहे.
या सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. “एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे” या ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या ज्ञानदीप अभियानातून आतापर्यंत १,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आले आहे. आता पुढील टप्प्यात आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला आधार देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित ठेवण्याचा संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Leave a Reply