
अमळनेर तालुक्यात चांगल्या पावसामुळे यंदा शेतशिवारात गावरान आंबा मोहरला
अवकाळी पाऊस आणि वादळामुळे नुकसानीची भीती
अमळनेर (प्रतिनिधी) यंदा चांगला पाऊस झाल्याने गावरान आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर आला आहे. त्यामुळे फळे चांगली येण्याची अपेक्षा आहे. मात्र हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे मोहर झडत असल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे.
अमळनेर तालुका तांब्याची मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांनी फळ झाड लागवड केली आहे. त्यात आंबा म्हटला म्हणजेच तोंडाला पाणी येते. त्यातही आंब्याला फळांचा राजा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. यंदा आंब्याच्या झाडाला चांगलाच मोहर आला आहे. त्यामुळे आंब्याचे बंपर उत्पादन अपेक्षित असले तरी अवकाळी पाऊस व वादळामुळे त्याची नासाडी होत आहे. मधूनच ढग दाटून वादळवारा सुटत असल्याने मोठ्या प्रमाणात मोहर झडल्याचेही दिसून येत आहे. मात्र तरीही झाड चांगले बहरलेले असून आंब्याच्या उत्पादनातून शेतकरी चांगला पैसा कमवून घेतात. यामुळे आलेला मोहर बघून शेतकरी समाधानी आहेत. मात्र वादळवारा मधूनच त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरवण्याचे काम करताना दिसत आहे. यंदा आंब्याच्या झाडांना चारी बाजूंनी मोहर आला असून, पीक चांगले येईल असा पूर्ण विश्वास असून, हवामान अनुकूल राहिल्यास आंब्यापासून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Leave a Reply