कोट्यवधींची यंत्रे धूळ खातायत; नगराध्यक्षांच्या ‘स्मार्ट’ स्वच्छतेचा फुगा फुटला?

अमळनेरात कोट्यवधींची यंत्रे ठरली ‘शोपीस’;  पूर आला, गाळ साचला तरी जेटिंग मशीन बंदच!

नगराध्यक्षांच्या स्वच्छतेच्या दाव्यांना गंज; कोट्यवधींची यंत्रे निष्क्रिय!

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील स्वच्छता व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरिक २.०) अंतर्गत अमळनेर नगर परिषदेला उपलब्ध करून देण्यात आलेले अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग मशीन आणि रोड स्वीपर मशीन सध्या वापराअभावी अक्षरशः ‘शोपीस’ ठरले आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच बोरी नदी आणि पिंपळे नाल्याला आलेल्या महापुरानंतर शहरातील नाले, गटारी आणि सांडपाणी वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, चिखल आणि कचरा साचला असतानाही जेटिंग मशीनचा प्रभावी वापर होऊ शकला नाही. प्रशिक्षणाअभावी यंत्रणा उभीच राहिल्याने नगर परिषदेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पूर ओसरल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये गाळ, चिखल, प्लास्टिक, बाटल्या आणि अन्य कचरा साचला. भुयारी गटारी व सांडपाणी वाहिन्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गाळ अडकला. अशा परिस्थितीत सक्शन कम जेटिंग मशीनचा वापर झाला असता तर गाळ, साचलेले पाणी आणि कचरा कमी वेळेत बाहेर काढणे शक्य झाले असते. यामुळे पूरानंतरची स्वच्छता मोहीम अधिक वेगाने राबविता आली असती. तसेच दुर्गंधी, डासांची उत्पत्ती आणि साथीच्या आजारांचा धोका कमी करण्यासाठीही या यंत्रणेचा उपयोग झाला असता. मात्र मशीन उपलब्ध असूनही त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळू शकलेला नाही.

 

पूरानंतरही मशीन बंद; गाळ मात्र शहरातच!

 

शहरातील नाले आणि सांडपाणी वाहिन्यांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही ती वापरात नसल्याचे चित्र आहे. एकीकडे पूरानंतर स्वच्छतेचे मोठे आव्हान उभे राहिले, तर दुसरीकडे हे मशीन नगर परिषदेच्या आवारात उभे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

२५ जूनला मशीनचे स्वागत… ऑगस्टमध्येही शहर गाळात!

 

नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या पुढाकारातून हे तंत्रज्ञानाधारित वाहन नगर परिषदेला उपलब्ध झाले. पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या यंत्रणेचा मोठा फायदा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र आवश्यक प्रशिक्षण वेळेत न झाल्याने मशीन अद्याप नियमित सेवेत दाखल होऊ शकलेले नाही.

संबंधित कंपनीकडून कुशल चालक आणि तज्ज्ञांमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रशिक्षण प्रक्रिया रखडल्याने इतर नगर परिषदांमध्ये प्रभावीपणे वापरली जाणारी ही आधुनिक यंत्रणा अमळनेरमध्ये मात्र निष्क्रिय राहिली आहे.

 

रोड स्वीपरही ‘इंधन महाग’ म्हणून बाजूला!

 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अमळनेर नगर परिषदेला रोड स्वीपर मशीनही उपलब्ध झाले आहे. मात्र एका किलोमीटरचा रस्ता साफ करण्यासाठी सुमारे दहा लिटर इंधन लागत असल्याने हे मशीन वापरणे परवडत नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे शहरातील रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याचे आव्हान असताना अत्याधुनिक रोड स्वीपरचा वापर इंधनखर्चामुळे मर्यादित असल्याचे चित्र आहे.

 

‘यंत्रणा आहे, पण ती चालवण्यासाठी मनुष्यबळ वापरले जात नाही!’

 

पूरानंतर शहरातील भुयारी गटारी, नाले आणि सांडपाणी वाहिन्यांमध्ये साचलेला गाळ, चिखल, प्लास्टिक, बाटल्या आणि अन्य कचरा कमी वेळेत काढण्यासाठी या मशीनचा प्रभावी वापर होऊ शकला असता. मात्र नियोजनाअभावी ही संधी हुकल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. “यंत्रणा आहे, पण ती चालविण्यासाठी मनुष्यबळ वापरले जात नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.नगर परिषद प्रशासनाने प्रशिक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सक्शन कम जेटिंग मशीन नियमित सेवेत आणावे, तसेच उपलब्ध अत्याधुनिक यंत्रणांचा शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष उपयोग करावा, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

 

‘मनुष्यबळ मिळताच प्रशिक्षण देऊन मशीन सुरू करू’

 

“मागील काळात अमळनेर नगर परिषदेशी संपर्क झाला होता. मात्र, सक्षम ड्रायव्हर आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने प्रशिक्षण प्रक्रिया रखडली. संबंधित मनुष्यबळ उपलब्ध होताच प्रशिक्षण देऊन जेटिंग मशीन लवकरच कार्यान्वित केले जाईल.”

– प्रदीप खैरनार, सुपरवायझर, आर्यन पंप इनव्हायरो सोल्युशन

 

‘प्रशिक्षित कर्मचारी मिळताच मशीन सेवेत आणू’

 

“सक्शन कम जेटिंग मशीन कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. प्रशिक्षित चालक व कर्मचारी उपलब्ध होताच मशीन नियमित सेवेत आणण्यात येईल.”

– गणेश शिंदे, मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद

 

‘रोड स्वीपर पेक्षा कामगारांकडून रस्ते झाडणे परवडेल’

 

रोड स्वीपर मशीन इंधनाला परवडत नाही. त्यापेक्षा कामगारांकडून रस्ते झाडने परवडेल. मोठ्या प्रमाणात रस्ते अस्वच्छ असतील तेव्हाच मशीन वापरणे परवडेल

– संतोष जाधव, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद अमळनेर

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *