रेल्वे स्टेशनसमोर गुटख्याची विक्री; अन्न व औषध प्रशासनाचा छापा, एकास अटकेत

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील द्वारका कोल्ड्रिंक्स दुकानात गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. या कारवाईत विमल मसाला, पान पराग मसाला आणि रजनीगंधा मसाला असे एकूण १२० पाऊच आढळून आले. याप्रकरणी दुकान मालक अंकित संजय अग्रवाल (वय २८, रा. डेविल्स पार्क, स्मार्ट बाजारसमोर, अमळनेर) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ६ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी रेल्वे स्टेशनसमोरील द्वारका कोल्ड्रिंक्स दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात ७९ विमल मसाला पाऊच, १० पान पराग मसाला पाऊच आणि ३१ रजनीगंधा मसाला पाऊच असा साठा आढळून आला. या प्रकरणी दुकान मालक अंकित संजय अग्रवाल याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २६(२), सहवाचता कलम ३०(२)(अ), २६(२)(४), २७(३)(ड), २७(३)(ई), ३(ड) झेड झेड ४, तसेच अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या १३ जुलैच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २७५, २७४ आणि २२३ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रेता-उत्पादक-पुरवठादारांची साखळी तपासण्याची मागणी

या प्रकरणाला केवळ दुकानातील गुटखा विक्रीपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील विक्रेता, उत्पादक आणि पुरवठादार यांची साखळी शोधून काढावी, अशी मागणी अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केली आहे. या साखळीच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी आणि अवैध मार्गाने आर्थिक लाभ घेतला जात असल्याचे आढळून आल्यास अन्न सुरक्षा कायदा तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणीही फिर्यादीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *