चौबारी-गलवाडेत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन मोटारसायकली लंपास

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील चौबारी आणि गलवाडे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन मोटारसायकली चोरून नेल्याच्या घटना घडल्या. २ ऑगस्टच्या रात्रीपासून ३ ऑगस्टच्या सकाळदरम्यान लोकांच्या घरांच्या अंगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या घटनांमुळे ग्रामीण भागात वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चौबारी आणि गलवाडे येथील नागरिकांनी त्यांच्या मोटारसायकली नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात उभ्या केल्या होत्या. मात्र सकाळी उठल्यानंतर अंगणातील वाहने गायब असल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीनही मोटारसायकली चोरून नेल्याचे समोर आले. चोरीस गेलेल्या वाहनांमध्ये २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची व लाल पट्टे असलेली एमएच १९ ईई १८९६ क्रमांकाची मोटारसायकल, २२ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची व सिल्व्हर पट्टे असलेली एमएच १२ एचजी ३२३४ क्रमांकाची मोटारसायकल आणि २० हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची व सिल्व्हर पट्टे असलेली एमएच १९ ईसी ७०५ क्रमांकाची मोटारसायकल यांचा समावेश आहे. एकाच रात्री तीन दुचाकी चोरीला गेल्याने चौबारी आणि गलवाडे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. घराच्या अंगणात उभ्या केलेल्या वाहनांवरही चोरट्यांची नजर असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. याप्रकरणी चौबारी येथील शेतकरी रामदास निंबा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील पुढील तपास करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *