
अमळनेर शेतकरी संघ निवडणुकीत उत्साह; जनरलमध्ये ४८.५२ तर सोसायटीत ९९.०६ टक्के मतदान
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाची मतदान प्रक्रिया दिनांक ३० मे रोजी उत्साहात पार पडली. कडक उन्हाची पर्वा न करता मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. जनरल मतदारसंघात ४८.५२ टक्के तर सोसायटी मतदारसंघात तब्बल ९९.०६ टक्के मतदान झाल्याने आज होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्यक्तिशः तथा जनरल मतदारसंघात १६ हजार ३३२ पैकी ७ हजार ९२५ मतदारांनी मतदान केले. त्यामुळे ४८.५२ टक्के मतदानाची नोंद झाली. विशेष म्हणजे एकूण मतदारसंख्येपैकी जवळपास २० टक्के मतदार मयत असल्याचे सांगितले जात असल्याने प्रत्यक्ष मतदानाचा टक्का ७५ च्या पुढे गेल्याचे मानले जात आहे. तर सोसायटी मतदारसंघात १०७ पैकी १०६ मतदारांनी मतदान केल्याने ९९.०६ टक्के मतदान झाले. माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे सुपुत्र अनिकेत पाटील मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.
अमळनेर शहरातील सानेगुरुजी विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. गर्दीमुळे धुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसच्या पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली.
१५ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत आमदार व खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आमदार अनिल भाईदास पाटील मतदानानंतर बराच वेळ मतदान केंद्रावर उपस्थित होते, तर खासदार स्मिताताई वाघ यांनीही मतदान करून दिवसभर केंद्रावर तळ ठोकला होता. काँग्रेसच्या नेतेमंडळींसह कार्यकर्तेही सकाळपासून सक्रिय होते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आबालवृद्ध मतदार वाहनांनी मतदानासाठी पोहोचत होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम होता. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदारांना “लक्ष्मी दर्शन” घडविल्याचीही चर्चा रंगली होती.
सोसायटी मतदारसंघ (५), व्यक्तिशः मतदारसंघ (५), महिला राखीव मतदारसंघ (२), इतर मागास वर्ग (१), एस.सी.-एस.टी. मतदारसंघ (१) आणि एन.टी. मतदारसंघ (१) अशा एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक झाली.
सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजप पॅनलमध्ये थेट लढत झाल्याने शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना आपल्याकडे वळविण्याची चुरस सुरू होती. त्यामुळे कोण कोणाचे गणित बिघडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक धर्मराज पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनिल महाजन व व्ही. एन. जगताप यांनी जबाबदारी सांभाळली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान शांततेत पार पडले.
आज होणार मतमोजणी
आज दिनांक ३१ मे रोजी सकाळी ८ वाजेपासून इंदिरा भुवन येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी १७ टेबल लावण्यात येणार असून १६ टेबलवर जनरल तर एका टेबलवर सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला सोसायटी मतदारसंघाचा निकाल जाहीर होईल. उर्वरित निकाल दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply