सीए राधेश्याम अग्रवाल यांची ‘शिक्षण प्रसारक मंडळी’च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने अमळनेरात नागरी सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सुपुत्र सी.ए. राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची पुणे येथील नामांकित ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम अमळनेर येथील बन्सीलाल पॅलेस येथे मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी राधेश्याम अग्रवाल यांची कन्या यशवी अग्रवाल हिने सी.ए. फायनल परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. दुहेरी आनंदाच्या या क्षणाचा सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत जे. बडगुजर होते, तर प्रमुख वक्ते म्हणून भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. याशिवाय माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, प्रा. डी. डी. पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, बजरंगलाल अग्रवाल, प्रा. एन. डी. पाटील आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून राधेश्याम अग्रवाल यांच्या निवडीचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. सत्काराला उत्तर देताना राधेश्याम अग्रवाल यांनी सर्वांचे आभार मानत ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ ही तब्बल १३७ वर्षांची परंपरा असलेली संस्था असून सुमारे १ लाख विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याचे सांगितले. आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबाचे सहकार्य आणि सततची प्रेरणा यामुळेच आपण या स्थानापर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नीरज अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन स्वामी विवेकानंद स्कूलचे प्राचार्य विनोद अमृतकर यांनी मानले. या कार्यक्रमाला खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर अर्बन बँकेचे पदाधिकारी, तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमंत प्रतापशेठ चॅरिटेबल फाउंडेशन व स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *