
आई-वडिलांना विसरू नका; त्यांच्याशिवाय जीवनाला अर्थ नाही : वसंत हंकारे
अमळनेर (प्रतिनिधी) जन्मापासून व्यक्तिमत्त्व घडविण्यापर्यंत आईच्या रक्ताचे आणि वडिलांच्या घामाचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे आई-वडिलांना कधीही विसरू नका; त्यांच्याशिवाय जीवनाला शून्य अर्थ आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते व समाजपरिवर्तनकार वसंत हंकारे यांनी केले. ते अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते.
शिवशाही समिती व मांडळ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती चौकात “न समजलेला बाप समजून घेताना” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कु. पूर्वशी पाटील हिच्या हस्ते आरती करण्यात आली.
वसंत हंकारे यांनी समाजातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत पळून जाणाऱ्या मुली, आई-वडिलांना सोडून जाणारी मुले आणि कौटुंबिक नात्यांतील दुरावा यांसारख्या संवेदनशील विषयांवर प्रभावीपणे विचार मांडले. त्यांनी सुरुवातीला विनोदी शैलीत प्रेक्षकांना हसवले आणि नंतर गंभीर होत आई-वडिलांच्या त्यागमय व कष्टमय जीवनावर प्रकाशझोत टाकत तरुणाईच्या डोळ्यांत अंजन घातले. त्यांच्या धीरगंभीर आवाजातील भावनिक आवाहनाला उपस्थितांनी साश्रुनयनांनी प्रतिसाद दिला. या व्याख्यानाला मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. सुनील चोरडिया, संजय पाटील, प्रभूदास पाटील, सीताराम कोळी, कलमाडीचे सरपंच सोनू झालसे यांच्यासह परिसरातील कलमाडी, वावडे, तरवाडे, मुडी, हेंकळवाडी, तामसवाडी, मोहाडी, जवखेडा व कंचनपूर येथील पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

Leave a Reply