भूमी सुपोषण संवर्धन अभियानाचा आज अमळनेरात शुभारंभ; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती

अमळनेर (प्रतिनिधी)  अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूमी सुपोषण संवर्धन या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, गुरुवार दि. १९ मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी २ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान प्रमुख उपस्थिती लावणार असून विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक-धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कृषी क्षेत्राशी निगडित महत्त्वाच्या या अभियानात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, विविध विभागांचे अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहनतळ, प्रवेशमार्ग आदी व्यवस्थेची पाहणीही करण्यात आली. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी सांगितले की, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीची सुपीकता कमी होत असून शेतकऱ्यांसमोर नापिकीचे संकट निर्माण झाले आहे. यावर उपाय म्हणून २०२१ पासून भूमी सुपोषण व संवर्धन अभियान देशभर राबविले जात आहे. या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अमळनेरात होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानाच्या यशस्वितेसाठी अक्षय कृषी परिवार, मंगळग्रह सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरंकारी परिवार तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्था अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

 

विशेष भोमयागाचे आयोजन

 

गुरुवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी १२ या वेळेत श्री भूमी माता जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात विशेष भोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रोच्चारात पूजाविधी पार पडणार आहे.

 

५१ फुटी गुढी उभारणार

 

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सकाळी ९ वाजता श्री मंगळग्रह मंदिरात ५१ फुटी गुढी उभारण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन केले जाणार आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *