
सारबेटे येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे येथे शबानाबी अरबाज खान मेवाती (वय २०) या तरुणीने ८ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, शबानाबी हिने राहत्या घरातील छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती वसीम याने तिच्या काकांना दिली. मुलीचे काका नबी खा अजमेर खा, रउफ खा अजमेर खा, इरफान खा अजमेर खा आणि जावेद हमीद खा हे अजिंठा येथे गेले होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी माघारी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत गावकऱ्यांनी शबानाबी हिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून सायंकाळी सहा वाजता तिला मृत घोषित केले. याप्रकरणी मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Leave a Reply