अमळनेरात २९ नोव्हेंबर नांदी साहित्य संमेलन; आध्यक्षपदी कवी प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर, स्वागताध्यक्षपदी सुदाम महाजन

अमळनेर (प्रतिनिधी) पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ९९ ठिकाणी नांदी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत अमळनेर येथे २९ नोव्हेंबर २०२६ रोजी एकदिवसीय नांदी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाध्यक्षपदी ख्यातनाम अहिराणी कवी, लेखक, गीतकार तथा चित्रपटलेखक प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर, तर स्वागताध्यक्षपदी कवी तथा निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

नांदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर आणि त्यांच्या पत्नी पुष्पा पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष उमेश काटे, ज्येष्ठ संचालक नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागुल, प्रा. डॉ. रमेश माने, मनोहर नेरकर, शरद पाटील, सुनिता पाटील, रत्नाकर पाटील आणि राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर हे शेतीशी नाळ जुळवून ठेवणारे कवी असून, खानदेशातील अहिराणी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील परिचित नाव आहे. अहिराणी भाषेतील पहिला चित्रपट मानल्या जाणाऱ्या ‘सटी ना टाक’ (१९९०) या चित्रपटापासून त्यांनी लेखन, अभिनय आणि गीतलेखनाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ‘चंदन’, ‘जमनं बरं का’, ‘नदारीना सौसार’, ‘काकाना घरमा डाका’, ‘मामानी कमाल भासानी धमाल’, ‘चितांग’, ‘ठिणगी’ आणि ‘गोरख’ अशा चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि अभिनयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ‘चंदन’ हा सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालेला पहिला अहिराणी चित्रपट म्हणून ओळखला जातो. अहिराणी गीतांना हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत गायकांपर्यंत पोहोचविण्यातही त्यांचे योगदान आहे. संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि विनय मांडके या गायकांनी त्यांच्या गीतांना स्वर दिला आहे. ‘कळंबूचा कर्ण’ या मालिकेचे लेखन व अभिनय, नाट्यलेखन तसेच ‘सोया वरिसनी साली’, ‘सत्तरशिंगी मायना उदो उदो’ आणि ‘वणीना गडवर’ यांसारख्या लोकप्रिय अल्बममधूनही त्यांनी आपली साहित्यिक व कलात्मक प्रतिभा दाखवली आहे.

अहिराणी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी ‘अहिराणी कस्तुरी’ या मासिकाच्या कार्यकारी संपादकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. विविध अहिराणी साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यासोबतच पिंगळवाडे या त्यांच्या गावी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या उपस्थितीत ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजनही केले आहे. त्यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक योगदानाची दखल घेत त्यांना ‘खानदेश भूषण’, ‘गुरुगौरव’, दा. गो. बोरसे पुरस्कार यांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शेती आणि साहित्य यांची सांगड घालत अहिराणी भाषेला चित्रपट, संगीत आणि साहित्याच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

 

साहित्य, संस्कृती आणि अहिराणी बोलींचा जागर

 

अमळनेर येथे होणारे हे नांदी साहित्य संमेलन सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनात ‘अहिराणीच्या बोलीभाषांची विविधता’ या विषयावर परिसंवाद, कवी संमेलन, गझल संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि प्रकट मुलाखत असे विविध साहित्यिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने संमेलनाचा समारोप होणार आहे. मराठी साहित्याच्या शतकमहोत्सवी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या नांदी संमेलनातून खानदेशातील साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या साहित्यिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व साहित्यप्रेमी, साहित्यिक आणि नागरिकांनी सहकार्य करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा अमळनेरचे अध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष उमेश काटे आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *