आषाढी एकादशी यात्रेत जी. एस. हायस्कूल मित्र परिवारातर्फे पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील श्री संत सखाराम महाराजांच्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त वर्ष १९८६ ते १९९१ जी. एस. हायस्कूल मित्र परिवाराच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत समाजसेवेचा आदर्श या उपक्रमातून जपण्यात आला.

आषाढी एकादशी यात्रेसाठी अमळनेरसह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. यात्रेच्या काळात उन्हामुळे किंवा गर्दीमुळे भाविकांना पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, या सामाजिक भावनेतून जी. एस. हायस्कूल मित्र परिवाराने हा उपक्रम राबविला. दिवसभर भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मित्र परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. अनेक यात्रेकरूंनी आयोजकांचे आभार मानत अशा सामाजिक उपक्रमांमुळे यात्रेचे महत्त्व अधिक वाढत असल्याची भावना व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्ता कासार, शरद पाटील, किर्तीकुमार कोठारी, मुकेश पारख, संजय वंजारी, अजय कासार, मुकेश शारदुल आणि कृष्णा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजसेवेची परंपरा जपत यात्रेकरूंच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जी. एस. हायस्कूल मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत असून, आषाढी एकादशी यात्रेत सेवाभावाचा एक प्रेरणादायी संदेश या माध्यमातून देण्यात आला.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *