संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; इतिहासाला आगीचा चटका

संकटाच्या क्षणी धर्म नाही, माणुसकी जिंकली; मदतकार्यात हिंदू-मुस्लिम एकत्र, देवमूर्ती सुरक्षित!

संत सखाराम महाराज मंदिर तात्पुरते बंद; दर्शनाला काही दिवस विराम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरच्या मजल्यावरील हभप संत प्रसाद महाराज यांच्या बैठक खोलीत लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. मंदिराची रचना संपूर्ण लाकडी असून दरवर्षी ऑइल पेंट करण्यात येत असल्याने आग झपाट्याने पसरली. नदीकाठावरील रस्त्यामुळे अग्निशमन बंबांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी आल्या. मात्र, अग्निशमन दल, खाजगी टँकर आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, सकाळीच हभप संत प्रसाद महाराज संत सखाराम महाराजांची पारंपरिक दिंडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास सीसीटीव्ही यंत्रणेत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

 

 “आधी पांडुरंग!”  प्रसाद महाराजांचा अढळ निर्धार,  महाराजांनी दाखवली श्रद्धेची ताकद

 

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वाडी संस्थानाला आग लागल्याची माहिती मिळूनही हभप संत प्रसाद महाराज यांनी दिंडी अर्धवट सोडून माघारी फिरण्यास नकार दिला. “आधी पांडुरंग महत्त्वाचा” अशी भूमिका घेत त्यांनी वारी सुरूच ठेवली. यापूर्वी स्वतःच्या आईच्या निधनानंतरही त्यांनी वारी सोडली नव्हती. पांडुरंगाच्या भक्तीपुढे दुःख, आनंद आणि मोह-माया क्षुल्लक असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर,शिरपूर नगरपरिषदेचे प्रशांत सरोदे, चोपडा नगराध्यक्षा यांचे पती तसेच अग्निशमन विभागाचे गणेश गोसावी यांनी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना केले. ते स्वतःही घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळे येत असताना अग्निशमन कर्मचाऱ्यांनी अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफर पठाण, सत्येनं संदानशिव, आनंद झिम्बल, मच्छिन्द्र चौधरी, भिका संदानशिव, रफीक पठाण,आकाश संदानशिव, लखन कंखरे, आकाश बाविस्कर,अजय बिऱ्हाडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

 

मानवतेच्या सेवेसाठी पत्रकार संघ मैदानात; टँकरधारकांना मदतीची हाक

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी चोपडा, शिरपूर व पारोळा येथून अतिरिक्त अग्निशमन बंब मागविण्याची विनंती केली. पारोळा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब तातडीने दाखल झाला. अमळनेर शहर पत्रकार संघाने सोशल मीडियावरून खाजगी टँकरधारकांना मदतीचे आवाहन केले, तर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आर. बी. कन्स्ट्रक्शनचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले.

 

यांनी केले मदतकार्य

 

पालिकेच्या वतीने अनिल महाजन, पंकज चौधरी, बाळा संदनशिव, पंकज भोई, गोपी कासार, सूरज परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नितीन निळे, विजय पाटील, संजय कौतिक पाटील, महेंद्र पाटील, प्रताप साळी,देवेंद्र कांबळे, सुनील भोई, लक्ष्मण महाजन, नाना धनगर,केतन जोशी,शोएब शेख, अरशद खान, हुजैफा पठाण, इमरान पठाण, नईम पठाण, नसीब पठाण, राजा पठाण, फरहान शेख, आकिब पठाण आणि रिजवान खान यांच्यासह अनेकांनी मदतकार्य केले. या प्रसंगी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले.

 

अधिकाऱ्यांची टीम तात्काळ दाखल

 

प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, चोपडा नगरपरिषदेचे अभियंता डिंगबर वाघ हे घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते. पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनी पोलीस ताफ्यासह गर्दी नियंत्रणात आणल्याने अग्निशमन दलाला मदतकार्य करणे सुलभ झाले.

 

बरेच जळाले पण देव शाबूत राहिले

आगीत वाडी संस्थानाचे मोठे नुकसान झाले. मात्र मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले.

संत सखाराम महाराज मंदिर तात्पुरते बंद; दर्शनाला काही दिवस विराम

 

मंदिराच्या इमारतीचे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली. तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनी भाविकांनी पुढील आदेशापर्यंत मंदिर परिसरात येऊ नये, असे आवाहन केले.

 

सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या

 

“अमळनेर येथील संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थेत लागलेल्या आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, आग आटोक्यात आणण्यासाठी जवळील तालुक्यांमधून अतिरिक्त अग्निशामक दलाचे बंब मागविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दल आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू असून, संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.”

 आमदार अनिल भाईदास पाटील 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *