अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील, उपाध्यक्षपदी गणेश भामरे यांची बिनविरोध निवड

शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या; संघाचे उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा : आमदार अनिल पाटील

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ही निवड केली.

अमळनेर तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे १०, काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३ तर भाजप प्रणित किसान विकास पॅनलचे २ संचालक निवडून आले होते. आमदार अनिल पाटील यांनी शेतकी संघावर एकहाती वर्चस्व मिळविल्याने सत्तेची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी सहकार पॅनलचे संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, शेतकरी पॅनलचे सुरेश पाटील, प्रा. शाम पवार तसेच किसान विकास पॅनलचे जितेंद्र पाटील व प्रफुल पवार उपस्थित होते. निर्धारित वेळेत सत्ताधारी गटातील फक्त दोघांचेच अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील व उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली संस्था जनतेने विश्वासाने आपल्या हाती दिली आहे. त्यामुळे जबाबदारी अधिक वाढली असून संघाची बळकटी, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पदाची अपेक्षा प्रत्येकाला असते, मात्र ज्यांनी त्याग केला आहे त्यांनाही भविष्यात संधी दिली जाईल, असे सूतोवाच त्यांनी केले. संघाची निवडणूक जिंकण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक पदावर संधी देण्याची सूचनाही त्यांनी संचालक मंडळाला केली.

यावेळी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाच्या ताकदीत भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *