
ज्वारी खरेदीतील घोळामुळे सहा दिवसांपासून खरेदी ठप्प; शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रांगेत
अमळनेर (प्रतिनिधी) : मार्केटिंग फेडरेशनतर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या ज्वारी खरेदी प्रक्रियेत नोंदणी क्रमांकात मोठा घोळ झाल्याचा आरोप झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे. व्यापारी आणि वशिलेबाजीमुळे काहींचा माल मोजला गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रांगेत उभे असून, खरेदी प्रक्रिया पूर्ववत होण्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
अमळनेर तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनच्या ज्वारी खरेदीसाठी फ्रुटसेल सोसायटीला परवानगी देण्यात आली आहे. या खरेदीसाठी मे महिन्यापासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. नोंदणीसाठी एकाच वेळी मोठी गर्दी झाल्याने रजिस्टर ठेवून शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आली. मात्र, त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करताना नोंदणी क्रमांकात गोंधळ झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नोंदणी रजिस्टरमध्ये असलेला क्रमांक ऑनलाईन नोंदणीमध्ये मागे-पुढे झाला. त्यामुळे ३०० क्रमांकाचा शेतकरी ९०० व्या क्रमांकावर गेल्याचे प्रकार घडले. या गोंधळामुळे काही शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा माल खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर मागाहून आलेल्या शेतकऱ्यांचा माल मोजण्यात आल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
त्यामुळे क्रमांकानुसार ट्रॅक्टर घेऊन शेतकरी खरेदी केंद्रावर दाखल झाले. ज्यांचा नोंदणी क्रमांक आधीचा आहे, त्यांचा माल आधी मोजण्यात यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली. या मागणीवरून शेतकऱ्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने अखेर ज्वारी खरेदी थांबवण्यात आली.
जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची भेट
शुक्रवारपासून ज्वारी खरेदी बंद असून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदी केंद्रावर रांगेत उभे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा मार्केटिंग अधिकारी सुनील मेने यांनी घटनास्थळी भेट देऊन फ्रुटसेल सोसायटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनाही बोलावण्यात आले.
नियमाप्रमाणे ज्यांचा क्रमांक असेल, त्यांचाच माल मोजला जाईल, असे सुनील मेने यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ज्वारी खरेदीचे दोन हजार क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. मात्र, नोंदणी प्रक्रियेत घोळ झाल्याचे आढळल्यास फ्रुटसेल सोसायटीविरोधात कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, शेतकऱ्यांमध्ये आपसात समजोता न झाल्याने अखेरीस अधिकारी घटनास्थळावरून निघून गेले.
ग्रेडर आजारी; तांत्रिक कोंडी कायम
दरम्यान, ज्वारी खरेदी करणारे ग्रेडर सुभाष पाटील आजारी पडल्याने त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे सांगण्यात आले. जुने ग्रेडर प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा दिल्याशिवाय नवीन ग्रेडरकडून खरेदी करता येत नसल्याने ज्वारी खरेदी प्रक्रियेत आणखी तांत्रिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
नोंदणीतील घोळ दूर करून आम्हाला न्याय द्यावा
“फ्रुटसेल सोसायटीत नोंदणीसाठी दोन तीन रजिस्टर ठेवले गेले त्यामुळे नम्बर मागेपुढे करण्यात आले. आम्हाला न्याय द्यावा व आमचा माल मोजला जावा.”
– शांताराम बाजीराव पाटील, लोण
मेसेज आला म्हणून माल आणला; आमच्यावर अन्याय नको
“आम्हाला ज्वारी खरेदीसाठी मेसेज आला म्हणून आम्ही माल आणला आहे. त्यामुळे आमचा माल मोजला पाहिजे मात्र काही शेतकऱ्यांनी आडमुठेपणाने आधी ट्रॅक्टर लावून ठेवले आहेत. त्यांना बाजूला करून खरेदी सुरू झाली पाहिजे आमच्यावर अन्याय नको.”
– कृष्णा पाटील, जानवे
यापुढे फ्रुटसेल सोसायटीकडून खरेदी नको, असा अहवाल पाठवू
“नोंदणी प्रक्रियेत फ्रुटसेल सोसायटीने घोळ केला आहे. त्यामुळे यापुढे सोसायटी कडून खरेदी करु नये असा अहवाल वरीष्ठाना पाठवला जाईल.”
– सुनील मेने, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Leave a Reply