
अजीम प्रेमजी यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ४२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
अमळनेर (प्रतिनिधी)विप्रोचे संस्थापक, ज्येष्ठ उद्योगपती व समाजसेवक अजीम प्रेमजी यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील राजाराम चौधरी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ४२५ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या आणि लेखन साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.
दि. २४ जुलै रोजी बन्सीलाल पॅलेस सभागृहात आयोजित कार्यक्रमात नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरला.
यावेळी विजय बग्जिलेवाले, जितेंद्रकुमार शर्मा, किरण निकम, राजाराम चौधरी तसेच उद्योजक विजय माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगत सुनील चौधरी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अशा सेवाभावी उपक्रमांची आज अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुनील चौधरी हे अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी सातत्याने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवत असून, त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळत आहे. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवींद्र देशमुख, सुनील माहेश्वरी, एस. डी. भरुचा, महेंद्र कोठारी, सुरेश पाटील, शेखर धनगर, धनराज चौधरी, संजय चौधरी, गौरव चौधरी, शुभम चौधरी तसेच चौधरी परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डिगंबर महाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन गौरव चौधरी यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला भक्कम आधार देणारा हा उपक्रम समाजातील दातृत्वाची भावना अधिक दृढ करणारा ठरला असून, शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सुनील चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply