
उष्णतेचा कहर : अमळनेर तालुक्यात चार ठिकाणी आगी
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला; शेतकरी व नागरिकांचीही मदत

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता आग लागण्याच्या घटनांमधून दिसून येत असून, रविवारी (दि. १७) एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. मात्र, अमळनेर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेळेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहिली घटना दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास मंगरूळ येथे घडली. गावालगत असलेल्या खळवाडीस अचानक आग लागली. त्यानंतर दुपारी १.५५ वाजता मारवड रोडवरील एका शेतात आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्याचवेळी दुपारी २.०५ वाजता गलवाडे रोडवरील गंगा एक्वा परिसरातील झाडांना आग लागली. काही मिनिटांतच दुपारी २.१५ वाजता नंदगाव रोडलगतच्या शेतांमध्येही आग लागल्याची घटना समोर आली.
घटनांची माहिती मिळताच नगरसेवक मुक्तार खाटीक, पंकज चौधरी आणि भुरा चौगुले यांनी अग्निशमन विभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तातडीने मदत मागविली. त्यानंतर अग्निशमन दलाने चारही ठिकाणी वेगाने पोहोचून आग विझविण्याचे काम हाती घेतले. अग्निशमनाधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, मुन्ना धनगर आणि आकाश बाविस्कर यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. विशेषतः नंदगाव रोडवरील तांबेपुरा परिसरात आग विझविताना माजी नगरसेवक मुक्तार खाटीक, बाबा खाटीक यांच्यासह शेतकरी नाना हिलाल पाटील, शेषराव रामराव पाटील आणि चेतन विजय पाटील यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला.
उन्हाचा तीव्र वाढता पारा, कोरडे गवत आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी शेत परिसरात तसेच उघड्या जागांमध्ये अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply