राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त मारवड येथे जनजागृती अभियान

“स्वच्छता राखा, पाणी साचू देऊ नका” ; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र मारवडतर्फे मारवड गावातील शिवाजी चौक येथे डेंग्यू जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग : साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” या घोषवाक्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमासाठी ग्रामस्थांना शिवाजी चौकात एकत्रित बोलावण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. साहील चौधरी होते. यावेळी आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. भारतात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१० पासून १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी डासांची पैदास रोखणे, नागरिकांना सावध करणे आणि डेंग्यूचे लवकर निदान याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे यांनी डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करताना घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, कुलर व फुलदाण्यांमधील पाणी नियमित बदलणे, लांब बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे यांनी डेंग्यू निदानासाठी करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्यांची माहिती दिली. यामध्ये एनएस-१ प्रतिजन चाचणी, आयजीएम व आयजीजी अँटीबॉडी चाचण्या, सीबीसी तपासणी तसेच पीसीआर चाचणीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. आशा सेविका राजश्री पाटील यांनी डेंग्यू आजार कसा पसरतो याविषयी माहिती दिली. संक्रमित एडिस डासाच्या चाव्यामुळे डेंग्यू होतो व हे डास प्रामुख्याने स्वच्छ व साचलेल्या पाण्यात वाढतात, असे त्यांनी सांगितले. डेंग्यूचा संसर्ग थेट व्यक्तीकडून व्यक्तीकडे होत नसून डासांमार्फतच पसरतो, याबाबतही त्यांनी जनजागृती केली.

कार्यक्रमात डॉ. साहील चौधरी यांनी डेंग्यूची लक्षणे आणि उपचार याविषयी मार्गदर्शन केले. उच्च ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, त्वचेवर पुरळ, उलटी, अतिसार आणि अशक्तपणा ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे असल्याचे त्यांनी सांगितले. डेंग्यूसाठी विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नसले तरी योग्य विश्रांती, पुरेसे पाणी आणि वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विद्या देवरे, सुनिता गावित, सरला परदेशी, विलास बिऱ्हाडे, हिरामण मेढे आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमानंतर डेंग्यू जनजागृतीसाठी गावात पत्रके लावण्यात आली तसेच गृहभेटी देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने संकलित करण्यात आले असून, आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी केले तर आभार आशा सेविका संगीता चौधरी यांनी मानले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *