
अमळनेर तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार; बोरी नदी, पिंपळे नाल्याला महापूर, अनेक घरांत पाणी, रस्ते व गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न-पाण्यासह जेसीबी मशिनरीचीही मदत
पूरग्रस्त अमळनेरमध्ये आमदार शिरीषदादा चौधरी यांची धाव; प्रशासनाच्या कामकाजाचा घेतला आढावा

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजविला असून नदी-नाल्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. बोरी नदी आणि पिंपळे नाल्याला आलेल्या महापुराचे पाणी शहरासह ग्रामीण भागात शिरल्याने अनेक घरांचे, दुकानांचे आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अमळनेरहून जळगाव, चोपडा व धुळ्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे रोहित्र पाण्यात गेल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. अमळनेरात प्रथमच एवढी विदारक पूरस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
सर्वत्र एकाचवेळी जोरदार पाऊस झाल्याने शहर आणि तालुक्यात प्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक वर्षांनंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. नदीच्या पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरचे पाण्याचे टँकरही वाहून आले. देवळी गावाजवळ खडकी नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने चोपड्याकडील वाहतूक बंद झाली होती. धुळे रोडवरील पुलावरूनही पाणी वाहू लागल्याने धुळ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
बाजार समितीत व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
पिंपळे नाल्याला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. नाल्याच्या पुराच्या पाण्याने बाजार समितीच्या मागील बाजूची भिंत फोडून पाणी थेट आवारात शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. धान्याच्या राशींचा खालचा थर पूर्णपणे पाण्यात गेल्याने मोठ्या प्रमाणात धान्य खराब झाले. काही ठिकाणी धान्य पाण्याच्या प्रवाहासोबत वाहूनही गेले. व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, हरभरा आदी धान्यांचे मोठे नुकसान झाले.
कॉलनी परिसरात गुडघाभर ते कमरेइतके पाणी
अतिवृष्टीचा फटका शहरातील विविध भागांनाही बसला. प्रसाद नगर, मुंदडा नगर, भालेराव नगर, मेघनगरी, पिंपळे रोड, ढेकू रोड, गलवाडे रस्ता आदी भागांत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. पिंपळे रस्त्यावर तर कमरेइतके पाणी आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
सम्राट हॉटेल परिसर, जोशीपुरा आणि शंकर नगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंचे नुकसान झाले. इस्लामपुरा परिसरातही घरांमध्ये पाणी शिरले. पैलाड भागात शेतमजुरांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले.
नागरिकांच्या मदतीला धावले लोकप्रतिनिधी
तांबेपुरा भागातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये विप्रो नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरल्याने मुख्तार खाटीक यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक सचिन पाटील आणि जालनधर चौधरी यांनी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील पाण्याचा प्रवाह ठिकठिकाणी मोकळा करून दिल्याने पाणी ओसरण्यास मदत झाली.
अनेक गावांचा संपर्क तुटला
अतिवृष्टीमुळे कळमसरे, पळासदळे, कन्हेरे, फापोरे, कावपिंप्री यांसह अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला होता. विविध ठिकाणी नाले तुंबल्याने आणि पाण्याचा प्रवाह अडल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले.
उपविभागीय अधिकारी मयुर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विविध पूरग्रस्त भागांची पाहणी करून अडथळे दूर करण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. ब्लॉक झालेले नाले मोकळे करून पाण्याचा मार्ग सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. पालिकेचा आरोग्य विभागही आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत करण्यात आला.
स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रांची व्यवस्था
मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर नगरपालिकेने घरात पाणी शिरलेल्या तसेच नदीकाठच्या धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व्यवस्था केली. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळा गांधलीपुरा, माळी मढी माळीवाडा आणि बहुउद्देशीय सभागृह, बहादरपूर नाका आदी ठिकाणी स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला.
जयनिल फाऊंडेशनचा पूरग्रस्तांना मोठा आधार
पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी जयनिल फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला. जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी आपल्या टीमसह प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांना धीर दिला. आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी, डंपर तसेच इतर मशिनरी उपलब्ध करून देण्यात आली.
जयनिल फाऊंडेशनच्या पुढाकाराने लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप, रोटरी क्लब तसेच अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याने बसस्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी तसेच नदीकाठावरून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दिवसभरात तब्बल चार ते पाच हजार अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आल्याने संकटाच्या काळात या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला. सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनीही मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.
अग्निशमन दलाने लहान बाळासह कुटुंबाला वाचवले
गुरुकृपा कॉलनीमध्ये पाणी अचानक वाढल्याने एक कुटुंब लहान बाळासह तसेच एक वृद्ध कुटुंब घरात अडकले होते. घरातील पलंगावर चढूनही पाणी वाढत असल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आमदार अनिल पाटील यांचे आवाहन
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. जास्त पाणी असलेल्या ठिकाणी जाऊ नये. घरात पाणी शिरत असल्यास तातडीने प्रशासनाला माहिती द्यावी. बोरी नदीकाठावरील तसेच पिंपळे नाला परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मदतकार्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रात तैनात आहेत. जयनिल फाऊंडेशनच्या वतीने अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून गरज असलेल्या नागरिकांनी जयनिल फाऊंडेशनशी संपर्क साधावा. इतर सामाजिक संस्थांनीही या संकटाच्या काळात मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले.
“आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे,” असा संदेश देत नागरिकांनी नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले.
अमळनेरमध्ये पूरस्थितीत नगरपरिषदेचे बचावकार्य
अमळनेर (प्रतिनिधी) मुसळधार पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या पूरस्थितीत अमळनेर नगरपरिषदेने प्रशासनासह बचाव व मदतकार्य राबविले. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, अधिकारी-कर्मचारी आणि नगरसेवकांनी विविध पूरग्रस्त भागांत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. दरम्यान, आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही पूरग्रस्त भागांची पाहणी करून नगरपरिषदेच्या बचावकार्याचा आढावा घेत नागरिकांना धीर दिला.

Leave a Reply