मुंदडा ग्लोबल स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची शिबिरात चमक; विविध स्पर्धांत पदकांची लयलूट

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित १० दिवसीय प्रशिक्षण शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुलींसाठी १६ ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान ज्युनियर विंग, तर मुलांसाठी २६ एप्रिल ते ५ मे २०२६ दरम्यान ज्युनियर डिव्हिजन शिबिर पार पडले. या शिबिरात शाळेच्या १९ मुली व २७ मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

शिबिरात आर्मीच्या पीआय स्टाफमार्फत कॅडेट्सना रायफल हाताळणी व फायरिंग, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट अँड बॅटल क्राफ्ट यांसह विविध विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक नियम, सायबर गुन्हे व मुलींची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून आवश्यक सूचना दिल्या. एनसीसी एएनओ अधिकाऱ्यांनी व्यक्तिमत्व विकास, वैयक्तिक स्वच्छता, नेट बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि ऑनलाइन फसवणूक यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मुंदडा स्कूलच्या कॅडेट्सनी चमकदार कामगिरी केली. संस्कृती पाटील हिने स्वसंरक्षण या विषयावर प्रभावी भाषण सादर करून छत्रपती संभाजीनगर गट कमांडर ब्रिगेडियर अनुप बरबरे यांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह मिळवले. ‘विकसित भारत २०४७’ या विषयावरील उत्कृष्ट भाषणासाठी प्राक्तन पाटील व ज्ञानेश पाटील यांना ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे यांच्या हस्ते रौप्य पदक प्रदान करण्यात आले.

व्हॉलीबॉल स्पर्धेत आयुष बागुल, निखिल साळुंखे, पृथ्वीराज पाटील, करण पाटील, मोहित पाटील आणि भार्गव दुसाने यांनी रौप्य पदक पटकावले. तसेच निमिषा अहिरराव व श्रद्धा लोहार यांना उत्कृष्ट सूत्रसंचालनासाठी सन्मानित करण्यात आले. या शिबिरात एएनओ पंकजराव पाटील यांनी मुलांना, तर सीटीओ सुलोचना महाले यांनी मुलींना सातत्याने मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा व छाया मुंदडा तसेच शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर व प्राचार्या विद्या लक्ष्मण यांनी सर्व यशस्वी कॅडेट्सचे कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *