आषाढी एकादशीला संत सखाराम महाराज वाडीत भाविकांचा उसळला महासागर

अमळनेर (प्रतिनिधी)  प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडीत आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या वारकरी दिंड्या, पालख्या, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि “विठ्ठल… विठ्ठल…”, “ज्ञानोबा-तुकाराम” या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दिवसभर संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अखंड रीघ लागल्याने वाडी परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

पहाटेपासूनच संत सखाराम महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला, पुरुष, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. ग्रामीण भागातून आलेल्या दिंड्यांमध्ये वारकरी टाळ, मृदुंग आणि भगव्या पताका हातात घेऊन अभंग म्हणत भक्तिरसात तल्लीन झाले होते. वाडीत प्रवेश करताच पंढरपूरात आल्याचा आनंद आणि विठ्ठलाच्या दर्शनाचे समाधान प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर झळकत होते.

मुख्य मंदिरातील दर्शनानंतर भाविकांनी वाळवंटातील समाधी मंदिरात जाऊन संत सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली. दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताहाचे वातावरण आणि वारकरी परंपरेची भक्तिमय अनुभूती लाभत होती.

आषाढी एकादशीनिमित्त भरलेल्या यात्रेमुळे वाडी परिसरात विविध दुकानांची रेलचेल पाहायला मिळाली. पूजेचे साहित्य, फुले, हार, प्रसाद, खेळणी तसेच विविध खाद्यपदार्थांच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने फुलून गेला होता.

अनेक भाविकांनी, “आमच्यासाठी हेच पंढरपूर आहे. येथेच पांडुरंगाच्या दर्शनाची अनुभूती मिळते,” अशा भावना व्यक्त करत संत सखाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

यंदाच्या आषाढी एकादशीचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे रंगोली कलाकार नितीन भदाणे यांनी साकारलेली भव्य कलाकृती ठरली. काही दिवसांपूर्वी आगीत नुकसान झालेल्या संत सखाराम महाराज वाडीच्या सभामंडपाचे वास्तवदर्शी चित्रण त्यांनी रांगोळीतून साकारले. या कलाकृतीतून वाडीच्या पुनर्बांधणीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. भाविकांनी या रांगोळीचे भरभरून कौतुक करत कलाकाराचे अभिनंदन केले. अनेकांनी या आकर्षक कलाकृतीसमोर छायाचित्रे काढून ती आपल्या आठवणीत जतन केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत सखाराम महाराज वाडीत दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. दिंड्यांचा उत्साह, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि भाविकांची उसळलेली गर्दी यामुळे अमळनेरचे “प्रति पंढरपूर” हे बिरूद यंदाही सार्थ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *