
श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त वक्तृत्व स्पर्धा झाली. त्यास विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक जे. एस. पाटील होते. व्यासपीठावर दिलीप पाटील, आर. एम. देशमुख, साळुंखे, मुकेश पाटील, दीपक महाजन तसेच वंजारी मॅडम उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या कार्याचा, साहित्याचा तसेच त्यांच्या त्यागमय जीवनाचा प्रभावी परिचय करून दिला. शिक्षक प्रतिनिधी म्हणून देशमुख सर व मुकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जे. एस. पाटील यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या देशभक्तीचा व साहित्याचा गौरवपूर्ण परिचय करून दिला. तसेच त्यांना “हिंद दी चादर” हा किताब का देण्यात आला, याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक महाजन यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल असा
रेणुका लाड (९ वी ब) हिने प्रथम क्रमांक पटकावला, भूमिका पाटील (९ वी अ) हिने द्वितीय क्रमांक मिळविला, तर उर्वशी महाजन (८ वी ब) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. आदिती पाटील (८ वी अ) हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

Leave a Reply