
माझा संकल्प-भूमी सुपोषण चळवळसाठीच्या महाशोभायात्रेस अमळनेरमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद
समाजातील सर्वच घटकांसह माता-भगिनींचाही उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था यांच्यातर्फे ‘माझा संकल्प-भूमी सुपोषण चळवळ’ जनजागृतीसाठी शहरातून भव्य महाशोभायात्रा काढण्यात आली. या महाशोभायात्रेस अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
महाशोभायात्रेत समाजातील सर्वच घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध महिला संघटना, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींचा सहभाग विशेष ठरला.
संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थान येथून सकाळी 8 वाजता महाशोभायात्रेचा प्रारंभ झाला. संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अक्षय कृषी परिवाराचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे व प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते श्री भूमीमातेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त जयश्रीताई साबे, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, आशिष चौधरी, निलेश महाजन, बाळा पवार, अमोल महाजन तसेच दै. ग्लोबल महातेज परिवारातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
महाशोभायात्रा सराफ बाजार, तिरंगा चौक, कॉटनबडी बाजार, हॉटेल पायल, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, मोठा बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड मार्गे श्री मंगळग्रह मंदिर येथे संपन्न झाली. सहभागींसाठी नाश्ता, चहा-पान व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
श्री भूमीमाता रथाने वेधले लक्ष
सजविलेल्या पालखीत श्री मंगळग्रह देवतेची पंचधातूंची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. आकर्षक ‘श्री भूमीमाता रथ’ हे महाशोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. विविध लेझीम पथके, ढोल-ताशा पथक, वेदपाठशाळेतील बाल वारकरी तसेच तालुक्यातील भजनी मंडळांनी वातावरण मंगलमय केले.
नऊवारी साडीतील कलशधारी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी साकारलेल्या महापुरुषांच्या वेशभूषेनेही लक्ष वेधले. मार्गावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. विविध मान्यवरांनी चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स व पाणी बाटल्यांचे वाटप केले.
यांचा होता सक्रिय सहभाग
प्रताप महाविद्यालय, अमळनेर, सावित्रीबाई कन्या शाळा, अमळनेर, लोकमान्य विद्यालय, अमळनेर, एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जी. एस. हायस्कूल, अमळनेर, साने गुरुजी विद्यालय, अमळनेर, लायन्स क्लब, अमळनेर, रोटरी क्लब, अमळनेर, जायन्ट्स ग्रुप, महिला हौसिंग सोसायटी (गुजरात), फुलराणी ग्रुप, आशा स्वयंसेविका आदींसह विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला.
घोषवाक्यांद्वारे जनजागृती
‘माती जपा-पाणी वाचवा’, ‘एक मूठ माती राष्ट्रासाठी’, ‘रासायनिकमुक्त शेती-हीच खरी देशभक्ती’, ‘जपूया माती-घडवूया समृद्धी’, ‘मातीची पूजा-राष्ट्राची सेवा’, ‘रासायनिक शेती सोडा-सेंद्रिय शेती जोडा’, ‘भूमी वाचवा-भविष्य घडवा’, ‘भूमी सुपोषण चळवळ महान’, ‘शेतकरी वाचला तर देश वाचला’, ‘एकच ध्यास-मृदा विकास’ अशा घोषवाक्यांनी शहर दणाणून गेले.
या मान्यवरांची लाभली उपस्थिती
उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक पंकज मुंदडे, योगेश मुंदडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, मनीष जोशी, नितीन विंचूरकर, डॉ. रवींद्र कालरा, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. धीरज कोकाटे, प्रीतेश पारख, प्रकाश जैन, अभिनय मुंदडा, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, लिनेस क्लबच्या डॉ. मयूरी जोशी, सोनल जोशी, कविता पारख, यजदी भरुचा, प्रदीप जैन, सुनील चौधरी, राजेश कुंदनानी, सूरज वरलानी, महावीर पहाडे, श्रमसाफल्य एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर, माजी नगरसेवक संजय पाटील आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
आमदार अनिलदादा पाटलांनी वाढविला उत्साह
महाशोभायात्रेस अनिलदादा पाटील यांनी भेट देऊन सहभागींना प्रोत्साहन दिले. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले तसेच उघड्या जीपमधून संपूर्ण महाशोभायात्रेची पाहणी केली. शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केल्याने वातावरण अधिक उत्साही झाले. आमदारांच्या उपस्थितीने सहभागींचा उत्साह दुणावला.

Leave a Reply