
सभागृहात ‘ढाणे वाघ’ कोण आणि ‘पोपट’ कोण ते जनतेला दिसू द्या; प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा
नगरसेवक सचिन पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना कठोर शब्दात दिले प्रतिउत्तर
अमळनेर (प्रतिनिधी) काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी लोकप्रतिनिधींविषयी केलेल्या वक्तव्यावर आता शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांकडून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे. नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत, “आमचे नगरसेवक आणि नगरसेविका हे ढाणे वाघ आणि वाघिणी आहेत; पोपट मात्र शोपीस असतात,” असा टोला लगावला.
पत्रकारांशी बोलताना सचिन पाटील म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेत बोलताना शिरीष चौधरी यांची जीभ कशी घसरली हे सर्वांनी ऐकले आहे. शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांवर टीका करण्यापूर्वी सभागृहात कोण खंबीरपणे उभे राहतात आणि कोण फक्त बोलबच्चन करतात हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. “आमच्या शहर विकास आघाडीचे नगरसेवक आणि नगरसेविका हे साक्षात ढाणे वाघ आणि वाघिणी आहेत. जे फक्त शोपीस असतात त्यांना पोपट म्हणतात. पोपटाला शोभेपुरते ठेवले जाते, पण वाघ लढायला तयार असतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, सभागृहात नेमके कोण कामासाठी लढतात आणि कोण फक्त दिखावा करतात हे जनतेला कळावे यासाठी प्रत्येक सभेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) करण्यात यावे. “तुमच्यात हिम्मत असेल तर नगरपरिषदेच्या प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा. पहिल्याच जनरल मीटिंगमध्ये आमच्या नगरसेवकांनी केलेल्या मुद्देसूद चर्चेमुळे तुमची जी चिरफाड झाली, ती जनतेपर्यंत पोहोचू नये म्हणूनच त्या बैठकीचे शूटिंग फुटेज आजपर्यंत दिले जात नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
सचिन पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, शहर विकास आघाडीने मागणी करूनही पहिल्या सर्वसाधारण सभेचे व्हिडिओ फुटेज देण्यात आलेले नाही. “जर तुम्ही खरे असाल, पारदर्शक असाल आणि भ्रष्टाचारापासून दूर असाल तर मग लाईव्ह प्रक्षेपण करण्यास किंवा पत्रकारांना सभागृहात प्रवेश देण्यास काय अडचण आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
देशातील विविध लोकशाही संस्थांचे उदाहरण देत ते म्हणाले की, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा या सर्व ठिकाणी पत्रकारांना सन्मानाने प्रवेश दिला जातो आणि कामकाजाचे थेट प्रक्षेपणही दाखवले जाते. मग नगरपरिषदेतच हा पारदर्शकपणा का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“जनतेला कळू द्या की कोण खरे, कोण खोटे, कोण प्रामाणिक आणि कोण भ्रष्ट आहे. तुमची नीती स्वच्छ असेल तर सभागृहातील कामकाज जनतेसमोर आणण्याची हिंमत दाखवा. पण तसे होत नाही, कारण सत्य बाहेर येण्याची भीती तुम्हाला आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
पत्रकारांना सभागृहात प्रवेश न देणे आणि बैठकींचे प्रक्षेपण न करणे हे जनतेपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, नगरपरिषदेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी तातडीने लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी नगरसेवक सचिन बळवंत पाटील यांनी केली.

Leave a Reply