दिल्लीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी खान्देशातील दोन सरपंच महिला रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधींची राष्ट्रीय परिषद आज ११ मार्च रोजी दिल्लीत होणार असून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील निवडक २६ महिला सरपंचांची निवड करण्यात आली आहे.

पंचायत राज विभागाच्या वतीने होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील चिमणपुरी पिंपळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांची निवड झाली असून त्या दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. तसेच धुळे जिल्ह्यातील फागणे येथील सरपंच विद्याबाई नगराज पाटील यांचीही निवड झाली असून खान्देशातून या दोन महिला सरपंच परिषदेसाठी दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवून विकासकामे राबविणाऱ्या आणि सर्वसमावेशक व लोकोपयोगी कामगिरी करणाऱ्या महिला सरपंचांची निवड या राष्ट्रीय परिषदेसाठी करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेतून महाराष्ट्रातील २६ महिला सरपंचांना निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून एकमेव महिला सरपंच म्हणून वर्षा युवराज पाटील यांचा समावेश झाला आहे.

सरपंच वर्षा पाटील यांनी ग्रामपंचायत क्षेत्रात महिला सक्षमीकरणावर विशेष भर देत विविध उपक्रम राबविले आहेत. महिला बचतगटांचे सक्षमीकरण, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, ग्रामसभेत महिलांचा सक्रिय सहभाग वाढविणे तसेच आदर्श महिला स्नेही गाव संकल्पनेवर कामकाज करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. याशिवाय बालविवाह रोखण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबविणे आणि बालमृत्यू टाळण्यासाठी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत. महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले. या कामांची दखल घेत पंचायत राज विभागाने त्यांची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड केली आहे. दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ११ मार्च रोजी ही राष्ट्रीय परिषद होणार आहे. देशभरातील महिला सरपंच या परिषदेत सहभागी होऊन पंचायत राज व्यवस्थेत महिलांची भूमिका, ग्रामविकासातील सहभाग आणि विविध उपक्रमांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, खान्देशातून निवड झालेल्या चिमणपुरी पिंपळेच्या सरपंच वर्षा युवराज पाटील आणि धुळे जिल्ह्यातील फागणे येथील सरपंच विद्याबाई नगराज पाटील या दोघी ९ मार्च रोजी रात्री दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्या निवडीमुळे खान्देशाच्या ग्रामविकास कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *