अमळनेर हादरले..! काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दोन घटनांनी तालुका हादरला

टाकरखेड्यात एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत; खौशी येथे तलावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यात गुरुवारी पहाटे आणि सकाळच्या सुमारास घडलेल्या दोन हृदयद्रावक घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली दुर्दैवी अंत झाल्याची घटना ताजी असतानाच खौशी येथे तलावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

टाकरखेड्यात एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

तालुक्यातील टाकरखेडा येथे बुधवारी, दि. २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सुनील अमृत भिल आणि त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवल्याची घटना समोर आली. या घटनेत चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला असून, गावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुनील भिल, पत्नी पार्वती आणि त्यांची मुले सनी व राज हे पहाटे सुमारे चार वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर रेल्वे रुळावर ही दुर्घटना घडली. पहाटे सुमारे ४.४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
मृतांमध्ये दांपत्यासह दुसरी इयत्तेत शिकणारा सनी आणि अंगणवाडीत जाणारा चिमुकला राज यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा एकाच वेळी अंत झाल्याने टाकरखेडा गाव सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश अहिरे, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, विजय भोई, योगेश बागुल आणि राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भिल कुटुंबाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, अशी चर्चा असली तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

खौशी येथे तलावात बाप-लेकाचा बुडून मृत्यू

दरम्यान, अमळनेर तालुक्यातील खौशी येथेही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. तलावात मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात मुलगा फसल्याचे वडिलांनी पाहिले. मुलाला वाचवण्यासाठी ते पाण्यात उतरले; मात्र मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ते स्वतःही गाळात फसले. यात बाप-लेकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या घटनेने खौशी गावावरही शोककळा पसरली आहे.
एकाच दिवशी अमळनेर तालुक्यात घडलेल्या या दोन हृदयद्रावक घटनांमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, दोन्ही घटनांचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *