पाडळसरे धरणासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज उभारा; शासनाने व्याज भरावे!

ॲन्युईटीच्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण करण्याची माजी आमदार साहेबराव पाटील यांची जलसंपदामंत्र्यांकडे मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) सतत अवर्षणप्रवण असलेल्या अमळनेर तालुक्यातील गंभीर दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी निम्न तापी प्रकल्प अर्थात पाडळसरे धरणाचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ॲन्युईटी पद्धतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि या कर्जाचे व्याज शासनाने भरावे, अशी मागणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे का, दुष्काळ सौम्यीकरण कार्यक्रम, पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि दुष्काळ व्यवस्थापन पुस्तिकेतील तरतुदींनुसार प्रत्येक शेताला पाणी मिळण्याच्या दृष्टीने सिंचन क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ या तत्त्वानुसार पाण्याचा कार्यक्षम वापर, जलस्रोतांची निर्मिती, पाणी वितरण, व्यवस्थापन, क्षेत्रीय वापर आणि विस्तार उपक्रमांवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या घटकापर्यंत सिंचनाचा लाभ पोहोचविणे गरजेचे आहे. त्यातूनच गंभीर दुष्काळावर प्रभावी उपाययोजना करता येतील, असे साहेबराव पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे. सतत अवर्षणप्रवण असलेल्या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाची किंमत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढत असून, धरणाचे काम रखडत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ॲन्युईटीच्या माध्यमातून निम्न तापी प्रकल्प पूर्ण करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे त्यांनी सुचविले आहे. स्वर्गीय अजित पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सध्या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि त्या कर्जावरील व्याज शासनाने भरावे. या पर्यायामुळे प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध होऊन कामाला गती मिळू शकते. केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून मिळणारा निधीही सुरू राहील. मात्र, ॲन्युईटीअंतर्गत अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्यास पाडळसरे धरण लवकर पूर्ण होऊन सिंचन क्षमतेत वाढ होईल. परिणामी अमळनेर तालुक्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून गंभीर दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य होईल, असा विश्वास माजी आमदार साहेबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *