
अमळनेरच्या शिक्षक अनिल पाटील यांच्या शैक्षणिक संशोधनाला पेटंट!
इंग्रजी शब्दसंग्रह आणि व्याकरण शिकविणारे उपकरण विकसित; भारत सरकारकडून डिझाइनला मान्यता

अमळनेर (प्रतिनिधी) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील इंग्रजी शिक्षक अनिल नथ्थू पाटील यांच्या शैक्षणिक संशोधनाची भारत सरकारने दखल घेतली असून, त्यांनी विकसित केलेल्या इंग्रजी शब्दसंग्रह आणि व्याकरण शिकण्याच्या उपकरणाच्या रचनेला पेटंट प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयातील अडचणी दूर करण्यासह शब्दसंग्रह वाढविणे आणि व्याकरण सहजपणे समजून घेता यावे, या उद्देशाने त्यांनी हा नवोपक्रम विकसित केला आहे. या रचनेला ५२०५१२-००१ हा नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. या संशोधनासाठी त्यांना प्रा. डॉ. बळीराम पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून इंग्रजी शब्दांचे ज्ञान आणि व्याकरणाची समज अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः इंग्रजी विषयात अडचणी जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे उपकरण उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. अभ्यासप्रक्रिया अधिक सोपी आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण शैक्षणिक नवोपक्रम मानला जात आहे. या रचनेच्या नोंदणीमुळे अनिल नथ्थू पाटील यांना त्यांच्या संशोधनाच्या डिझाइनवर कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे या रचनेची अनधिकृत नक्कल आणि व्यावसायिक वापराविरुद्ध त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झाले आहेत. तसेच भविष्यात औद्योगिक संस्थांसोबत सहकार्य, परवाना, तांत्रिक विकास आणि व्यापारीकरणाच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. डिझाइन अधिनियम २००० आणि डिझाइन नियम २००१ नुसार नोंदणीकृत रचनेला सुरुवातीला दहा वर्षांचे संरक्षण मिळते. विहित प्रक्रियेनुसार त्यात आणखी पाच वर्षांची मुदतवाढ घेता येते. शैक्षणिक क्षेत्रातील समस्या ओळखून त्यावर तांत्रिक संशोधनाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा अनिल नथ्थू पाटील यांचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक बाळासाहेब अनिकेत विजय पाटील, मार्गदर्शिका शीलाताई पाटील, शिक्षण मानद संचालक प्रा. सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्याम पवार, प्राचार्य पी. एम. कोळी तसेच सर्व सहकारी आणि मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply