रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा!

रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अमळनेर(प्रतिनिधी ) २२ नोव्हेंबर २०२६ : आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत अमळनेर रोटरी क्लबचे तरुण, उत्साही व सक्रिय सदस्य रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सन २०२७-२८ या वर्षासाठी असिस्टंट गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रोटरी क्लब अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रोटे. कीर्तीकुमार कोठारी हे सध्या सन २०२६-२७ साठी अमळनेर एन्क्लेव्हचे सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर निवड करण्यात आली आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे सन २०२७-२८ चे नियोजित गव्हर्नर रोटे. किशोर राठी (नागपूर) यांनी ई-मेलद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत माहिती दिली आहे. रोटे. कीर्तीकुमार कोठारी हे अमळनेर येथील सुप्रसिद्ध ‘कीर्ती कॉम्प्युटर’चे संचालक असून अकाउंटिंग क्षेत्रातही त्यांनी स्वतःचा वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने व कुशलतेने पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रिक्टमधील ज्येष्ठ पदाधिकारी, रोटरी परिवारातील सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले असून पुढील सामाजिक व सेवाभावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीमुळे अमळनेरच्या सामाजिक क्षेत्राचा मान उंचावला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती रोटे. मकसूद बोहरी यांनी दिली.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *