
गोवंश कत्तलीचे प्रकार उघड; अमळनेरचा कत्तलखाना पालिकेकडून सील!
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कत्तलखान्यात सलग दोन दिवस गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याचे आढळून आल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने कत्तलखाना सील केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या तपासणीत कत्तल केलेले मांस, कातडी, शिंगे आणि सुमारे ५७० किलो मांस आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई केली होती. दरम्यान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांनी शिष्टमंडळासह पालिकेला निवेदन देत कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून उध्वस्त करण्याची मागणी केली होती. कारवाईसाठी आठ दिवसांची मुदत देत तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत माजी आमदार शिरीष चौधरी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी कत्तलखाना सील करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार प्रभारी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी आरोग्य विभागाला कारवाईच्या सूचना दिल्या. आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, संतोष जाधव, किरण कंडारे तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मयुर पाटील, नम्रता जरे, योगेश पवार, परम चव्हाण, रिजवान शेख सलीम आणि अनंत संदानशिव यांच्या पथकाने कत्तलखाना सील केला. दरम्यान, सोमवारी कत्तलखान्यातील ओटेधारकांना नियम व अटींचा भंग केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Leave a Reply