अमळनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार! केशवनगरमध्ये अनेक महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया; नागरिकांच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष!

एकीकडे शहरात पाण्याचा ठणठणाट, तर दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची उघडपणे नासाडी; पाणीपुरवठा अभियंता, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!

 

अमळनेर (प्रतिनिधी )अमळनेर शहरातील केशवनगर भागात सोनार सर यांच्या घराजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची पाइपलाइन लिकेज असल्याचे चित्र समोर आले आहे. या लिकेजमधून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून वाया जात असून, याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरपालिकेला वारंवार कळवूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. एकीकडे अमळनेर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असताना दुसरीकडे केशवनगरमध्ये मात्र अनेक महिन्यांपासून लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी नगरपालिकेच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतरही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसेल, तर नागरिकांनी नेमके दाद मागायची तरी कोणाकडे? पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना त्याची अशी उघडपणे होणारी नासाडी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. पाणीपुरवठा अभियंता नेमके काय करीत आहेत? मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांचे या गंभीर समस्येकडे लक्ष आहे की नाही? नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी कोणाची? की नागरिकांनी वारंवार तक्रारी करायच्या आणि प्रशासनाने मात्र डोळेझाक करायची? नगरपालिका प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने घटनास्थळी पाहणी करून पाण्याची गळती कायमस्वरूपी बंद करावी. तसेच इतक्या महिन्यांपासून हा प्रकार सुरू असताना संबंधित विभागाने दुरुस्ती का केली नाही, याचीही चौकशी करावी, अशी मागणी केशवनगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे! पाणी वाचवा, पाण्याची नासाडी थांबवा आणि नागरिकांना दिलासा द्या! नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने काम करणे अपेक्षित आहे. अन्यथा, पाणीटंचाईच्या काळात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असताना नगरपालिका प्रशासन नेमके कोणासाठी आणि कशासाठी कार्यरत आहे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *