विहिरीत पडलेल्या गायीची अग्निशमन दलाकडून यशस्वी सुटका

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील आर. के. नगर परिसरात खुल्या विहिरीत पडलेल्या गायीची अग्निशमन दलाने तत्परतेने धाव घेत सुखरूप सुटका केली. रविवारी दि. ३० रोजी सकाळी ही घटना घडली असून स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कामगिरीचे कौतुक केले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आर. के. नगर परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या विहिरीत सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास एक गाय पडल्याची माहिती नगरसेवक महेश देशमुख यांना मिळाली. त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, मच्छीन्द्र चौधरी, भिका संदानशीव, समाधान केदार, आनंद बैसाणे, अक्षय अहिरे व राकेश शिरसाठ यांनी विहिरीत दोर सोडून आणि आवश्यक साहित्याच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांती गायीला सुरक्षितपणे वर काढले. या बचावकार्यात काही वेळ प्रयत्न सुरू होते, मात्र अखेर गायीची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

या घटनेमुळे खुल्या विहिरींना सुरक्षित जाळी किंवा कठडे बसवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसह जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी खुल्या विहिरी सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *