
शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत ३२ संघांतील २५० खेळाडूंचा सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव व एरंडोल विभागाचे क्रीडा सचिव प्राध्यापक डॉ. देवदत्त पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी प्रमिला दत्तात्रेय पाटील, प्रा. डॉ. नयना कैलास पाटील, डी. आर. कन्या मुख्याध्यापिका एस एस सुर्यवंशी, प्रा. निशा शैलेंद्र पाटील, धनदाई महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रा. जयवंत पाटील, अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष एस पी वाघ तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. शैलेंद्र पाटील उपस्थित होते. मेजर ध्यानचंद व बजरंग बली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, श्रीफळ फोडून तसेच मैदान व चेंडूची पूजा करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील १४, १७ व १९ वर्षांआतील मुला-मुलींच्या गटातील एकूण ३२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून त्यात मुलांचे २० तर मुलींचे १२ संघ होते. सुमारे २५० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावेळी प्रमिला दत्तात्रेय पाटील यांनी खेळाडूंनी मेहनत करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. नयना कैलास पाटील यांनी खेळाडू शिस्तप्रिय व मेहनती असतात, असे सांगितले. मुख्याध्यापिका एस एस सुर्यवंशी यांनी खेळाडूंना चांगले दिवस असून विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले. प्राध्यापक डॉ. देवदत्त पाटील यांनी शालेय स्पर्धांमधून खेळाडूंना विविध संधी मिळतात. कष्ट व मेहनत करून देशाचा मान वाढवावा, असे आवाहन केले. स्पर्धेतील सामने अत्यंत रोमांचक व अटीतटीचे झाले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ग्लोबल स्कूल विजयी, तर स्वामी विवेकानंद स्कूल उपविजयी ठरले. तसेच शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे विजयी, तर स्वामी विवेकानंद स्कूल उपविजयी ठरले. १७ वर्षांखालील गटात साने गुरुजी विजयी, तर ललिता पाटील स्कूल उपविजयी ठरले. शारदा विद्यालय, कळमसरे विजयी, तर स्वामी विवेकानंद स्कूल उपविजयी ठरले. १९ वर्षांखालील गटात प्रताप कॉलेज विजयी, तर जय योगेश्वर विद्यालय उपविजयी ठरले. यावेळी प्रा.प्रितेश तुरणकर व स्वप्निल पाटील यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन उपस्थितांचा सत्कार केला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आर. ए. घुगे, आर एस सोनवणे, विनायक सूर्यवंशी, जे. व्ही. बाविस्कर, जयेश मासरे, सागर चावरीया, एस वाय करंदीकर, मयूर बारस्कर, के आर बाविस्कर, महेंद्र पारधी, आर. ए. पवार, हेमंत जाधव, योगेश पाटील, कृष्णा तुरे, राजेंद्र देशमुख, आदित्य राज पाटील, राजेश राठोड, केदार देशमुख, ज्ञानेश्वर महाजन, मुनाफ तडवी इत्यादी शिक्षकांनी पंचांचे काम पाहिले व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply