विश्वास तात्या फाउंडेशनच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल १९८ खेळाडूंचा सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) विश्वास तात्या फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा दुप्पट प्रतिसाद मिळत तब्बल १९८ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविल्याने ही स्पर्धा विशेष ठरली. ग्रामीण भागातील खेळाडूंना स्पर्धात्मक बुद्धिबळाचे नियम, शिस्त आणि प्रत्यक्ष स्पर्धेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमातून अमळनेर परिसरातील बुद्धिबळ संस्कृतीला नवी चालना मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

स्पर्धेचे आयोजक डॉ. सागर पाटील यांनी सुरुवातीला सुमारे १०० खेळाडू सहभागी होतील, या अंदाजाने नियोजन केले होते. मात्र नोंदणीची संख्या दुपटीने वाढून १९८ वर पोहोचल्याने व्यवस्थापनावर काही प्रमाणात ताण आला. तरीही सर्व खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर अथक परिश्रम घेतले.

या स्पर्धेत सर्वाधिक ११२ खेळाडू अमळनेर येथील होते. यामध्ये स्वामी विवेकानंद शाळेचे १०, बोहरा शाळेचे ६, स्टार्स अकॅडमीचे ६, तर इतर ९० खेळाडूंचा समावेश होता. याशिवाय धरणगाव ३, एरंडोल २, चोपडा ३, भुसावळ ४, रावेर ३, चाळीसगाव ८, धुळे ८, शिरपूर १८, तळोदा ४, नंदुरबार ४, दोंडाईचा २, बुऱ्हाणपूर १ आणि खामगाव १ अशा विविध ठिकाणांहून खेळाडूंनी लांबचा प्रवास करून स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेअखेर काही खेळाडू विजेतेपद आणि बक्षिसे घेऊन परतले, तर अनेक खेळाडू नवीन ज्ञान, आत्मविश्वास, स्पर्धेचा अनुभव आणि बुद्धिबळाविषयी अधिक समृद्ध समज घेऊन घरी परतले. त्यामुळे विश्वास तात्या फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही पहिली एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धा केवळ विजेतेपदासाठीची स्पर्धा न ठरता अमळनेर परिसरातील खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि बुद्धिबळ संस्कृतीला नवी दिशा देणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

आंतरराष्ट्रीय नियमांचा प्रत्यक्ष अनुभव

 

स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडू आणि पालकांना प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. अवैध चाल, स्पर्श केलेली सोंगटी खेळण्याचा नियम, एकाच हाताने सोंगट्या हलविणे व घड्याळ दाबण्याचा नियम, एन पासाँ, लाँग कॅसल यांसारख्या महत्त्वाच्या नियमांची माहिती अनेकांसाठी नवी होती. याशिवाय पालकांना स्विस लीग पद्धतीची माहिती मिळाली. प्रत्येक फेरीनंतर नवीन प्रतिस्पर्धी कसा ठरतो, पराभवानंतरही पुढील सर्व फेऱ्या खेळता येतात, याबाबतची माहितीही या स्पर्धेतून पालक आणि खेळाडूंना मिळाली. त्यामुळे स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता बुद्धिबळाच्या शिस्तबद्ध आणि नियमबद्ध स्पर्धात्मक स्वरूपाची ओळख करून देणारी ठरली.

पराभवातून शिकण्याची मानसिकता

स्पर्धेचा उद्देश केवळ विजेते ठरविणे हा नव्हता, तर ग्रामीण भागातील खेळाडू आणि पालकांना स्पर्धात्मक बुद्धिबळाचे नियम, शिस्त आणि वातावरणाचा अनुभव देणे हा होता, असे डॉ. सागर पाटील यांनी सांगितले. अनेक लहान खेळाडूंनी अनुभवी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आत्मविश्वासाने खेळ केला. पराभवातून शिकण्याची मानसिकता विकसित झाल्याचेही स्पर्धेदरम्यान दिसून आले. काही खेळाडूंनी स्वतःपेक्षा कमी वयाच्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभूत झाल्यानंतर अधिक सराव करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपल्या मुलांना प्रत्यक्ष स्पर्धेत खेळताना पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केले. त्यामुळे स्पर्धेने खेळाडूंच्या आत्मविश्वासासोबतच पालकांमध्येही बुद्धिबळाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला.

स्पर्धेनंतर मिळाले समाधान’ : डॉ. सागर पाटील

स्पर्धेच्या यशासाठी आयोजकांनी दिवसभर हॉल व्यवस्थापन, नोंदणी, खेळाडूंच्या शंकांचे निरसन तसेच विविध तांत्रिक बाबी सांभाळत अथक परिश्रम घेतले. स्पर्धेच्या अनुभवाबाबत भावना व्यक्त करताना डॉ. सागर पाटील म्हणाले, “डॉक्टर म्हणून गंभीर अवस्थेतील रुग्णाला वाचवल्यानंतर जे समाधान मिळते, त्याचप्रमाणे समाधान या स्पर्धेनंतर मिळाले. स्पर्धा किती यशस्वी झाली हे सहभागी सांगतील; मात्र मला जे द्यायचे होते ते मी दिले आणि जे हवे होते ते समाधान मला मिळाले.”

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *