
लोंढवे माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
अमळनेर (प्रतिनिधी) स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला. या निमित्ताने विद्यालयात दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. त्यांच्या देशप्रेम, समाजसुधारणा, शिक्षणप्रेम तसेच साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मांडली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक डि. बी. सोनवणे आणि मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्रजागृतीच्या कार्यात दिलेल्या योगदानाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक समतेसाठी मांडलेले विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
महापुरुषांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असून, त्यांच्या जीवनातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि समतेची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता त्यांच्या विचारांनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि. एम. पवार यांनी केले.

Leave a Reply