
राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक संवाद; नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस आणि अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच नीट (राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ पदयात्रा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शाम्भवी शुक्ला आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी युवकांना मार्गदर्शन केले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष पवार, किरण पाटील आणि तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. विविध पदाधिकारी व नेत्यांनी युवकांना संघटनात्मक कामकाज आणि सामाजिक प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध आघाड्या व विभागांच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसतर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवादल, इतर मागासवर्गीय विभाग, अनुसूचित जाती विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच समाजमाध्यम विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
बैठकीनंतर मराठा मंगल कार्यालय ते तहसीलदार कार्यालय अशी पदयात्रा काढून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय बाहेरगावी परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रवेशपत्राच्या आधारे मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले, तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply