चोपड्यातील चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ५ वर्षे सश्रम कारावास; अमळनेर जिल्हा न्यायालयाचा निकाल

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील हमीद नगर येथील रहिवासी सलमान खान अख्तर खान (वय २८) याला अमळनेर येथील जिल्हा न्यायालयाने लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि एकूण ५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  चोपडा शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गु.र.नं. ३८५/२०२४ व स्पेशल केस नं. ५०/२०२४ नुसार, ही घटना १२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० च्या सुमारास घडली होती. फिर्यादी महिला व तिचा पती जमीर मिस्त्री हे चोपडा शहरातील नागलवाडी रोडवरील एका बांधकाम साईटवर कामासाठी गेले होते. लहान मुलगी घरी असल्याने तिची मोठी बहीण काळजी घेण्यासाठी घरीच थांबली होती. दुपारी ४:३० च्या सुमारास आरोपी सलमान शेख हा फिर्यादीच्या कामाच्या ठिकाणी आला आणि “तुमची मुले घरी रडत आहेत, माझ्यासोबत चला,” असे सांगितले. यानंतर फिर्यादी, तिचा पती व आरोपी तिघेही मोसा बसने घरी निघाले. १०-१५ मिनिटांत घरी पोहोचल्यावर मोठी मुलगी घराबाहेर रडत उभी असलेली दिसली. फिर्यादीने मुलीला जवळ घेऊन शांत केले आणि रडण्याचे कारण विचारले. तेव्हा मुलीने सांगितले की, दुपारी १:०० ते १:३० च्या सुमारास ती व तिची लहान बहीण घराबाहेर खेळत होती. लहान बहीण घरात झोपायला गेल्यानंतर, बांधकामावर काम करणारा सलमान शेख हा घरासमोर आला. त्याने लहान बहिणीचा हात धरून तिला घराबाहेर काढले आणि पीडित मुलीला जबरदस्तीने घरातील खाटेवर झोपवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याचा हात झटकला आणि रडत आरडाओरडा केला. आवाज ऐकून लहान बहीण घरात आली, तेव्हा आरोपीने तिला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, लहान बहीण बाहेर गेल्यावर आरोपी स्वतः घाबरून तिथून पळून गेला. या घटनेनंतर फिर्यादीने मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद यशस्वी सदर खटल्याचे कामकाज श्रीमती सी. व्ही. पाटील (जिल्हा न्यायाधीश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश) यांच्या न्यायालयात चालले. सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल आणि मंगरूळकर यांनी न्यायालयात एकूण ७ साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घरमालक व वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांच्या साक्षी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. सर्व साक्षीदारांच्या साक्षी एकमेकांशी सुसंगत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

 

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा 

 

पॉक्सो कायदा कलम १० (बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२): ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५,००० रुपये दंड, भारतीय न्याय संहिता कलम ३३२(क): ६ महिने साधी शिक्षा आणि ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास: एकूण दंडाची रक्कम न भरल्यास ६ महिने अतिरिक्त साधी शिक्षा भोगावी लागेल.

 

पोलीस यंत्रणेची कामगिरी

 

सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुनाल सोनवणे व चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी केला. तसेच पैर्वी अधिकारी म्हणून पी.एस.आय. उदयसिंग साळुके, पो.हे.कॉ. प्रमोद पाटील, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाळके, पो.कॉ. राहुल रणधीर, पो.कॉ. सतीश भोई आणि पो.कॉ. भरत इशी यांनी तपासात व न्यायालयीन कामकाजात मोलाचे सहकार्य केले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *