अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची आर्थिक लूट?

सेतूचालकांकडून टप्प्याटप्प्याने प्रक्रिया; ग्रामीण भागातील पालक त्रस्त

अमळनेर (प्रतिनिधी) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांना या प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही सेतूचालकांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि महाविद्यालयांची पसंतीक्रमानुसार निवड करणे ही संपूर्ण प्रक्रिया संगणकाद्वारे केली जात आहे. या प्रक्रियेसाठी सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून साधारण १५० ते ३०० रुपये आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी ही प्रक्रिया एकाचवेळी पूर्ण करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने केली जात असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला फक्त दहावीचा परीक्षा क्रमांक टाकून माहिती भरली जाते आणि अर्ज लॉक केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा बोलावून कागदपत्रे अपलोड केली जातात. त्यानंतर तिसऱ्यांदा बोलावून महाविद्यालयांची निवड केली जाते. प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने ते पूर्णपणे सेतू केंद्रांवर अवलंबून आहेत. या परिस्थितीचा काही सेतूचालक गैरफायदा घेत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया एकाचवेळी पूर्ण होऊ शकत असतानाही जाणूनबुजून ती वेगवेगळ्या टप्प्यांत विभागली जात असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असून शिक्षण विभागाने या प्रकाराची दखल घेऊन शुल्काबाबत स्पष्ट नियमावली जाहीर करावी, तसेच सेतू केंद्रांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *