
धुळेतील जानवी ठाकरे आत्महत्याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) धुळे शहरातील गोडीबार टेकडी परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय कु. जानवी जितेंद्र ठाकरे हिला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच हा खटला विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी अमळनेर युवा परिषद (धोबी) मंडळाने केली आहे. यासंदर्भात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अमळनेर तहसीलदारांमार्फत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात या प्रकरणातील दोषींवर कायद्यातील कठोर कलमांनुसार गुन्हे दाखल करून तपासात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तपास यंत्रणेने निष्पक्ष व वेगवान तपास पूर्ण करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा मिळवून द्यावी, अशीही भूमिका मंडळाने मांडली. तसेच हा खटला सामान्य न्यायालयातील प्रदीर्घ प्रक्रियेत अडकू न देता विशेष जलदगती न्यायालयात चालवावा, जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळू शकेल, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
युवा परिषद (धोबी) मंडळाने निवेदनात म्हटले आहे की, “ही लढाई केवळ एका कुटुंबाची नसून प्रत्येक मुलीच्या सन्मानाची आणि सुरक्षिततेची आहे. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या कोणत्याही लेकीवर अशा प्रकारचा अन्याय होऊ शकतो.” त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात तातडीने ठोस पावले उचलावीत. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मंडळाने दिला. निवेदन देताना अमळनेर युवा परिषद (धोबी) मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साहेबराव जाधव, सचिव विजय शिवाजी वाघ, कार्याध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष उमेश वाल्हे, सहसचिव अनिल वाल्हे, खजिनदार सतीश पवार, अविनाश जाधव, गंगाराम वाल्हे, गणेश नेरकर, अनिल वाघ, किशोर महाले, दीपक वाल्हे, भरत जावदेकर, जयसिंग परदेशी, विक्की जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply