१५४ वर्षांच्या साने गुरुजी ग्रंथालयात निवडणुकीवरून पेटला वाद

सहा वर्षे निवडणूक नाही, आता थेट कार्यकारी मंडळ निवडीचा डाव ?

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील १५४ वर्षांची परंपरा लाभलेल्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कार्यकारी मंडळाची मुदत संपूनही तब्बल सहा वर्षे निवडणूक न घेता कारभार सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. आता सन २०२२, २०२३, २०२४ व २०२५ या चार वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा एकाच दिवशी घेऊन त्याच सभेत नवीन कार्यकारी मंडळ निवडण्याचा प्रयत्न होत असल्याने संस्थेतील वाद चिघळला आहे.

याबाबत सभासदांच्या म्हणण्यानुसार, विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत २२ जुलै २०२० रोजीच संपुष्टात आली होती. त्यानंतर नियमाप्रमाणे निवडणूक न घेता संस्थेचा कारभार सुरू ठेवण्यात आला. या काळात शासनाकडून दरवर्षी मिळणाऱ्या सुमारे साडेसहा लाख रुपयांच्या अनुदानावर आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्यात आले. मात्र, सभासदांसाठी व्याख्यानमाला, साहित्यिक कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

रविवार, दि. १२ जुलै रोजी चार वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या असून, अनेक सभासदांना नियमानुसार घरपोच अजेंडा देण्यात आला नसल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे विषयपत्रिकेतील विषय क्रमांक ९ – “कार्यकारी मंडळाची निवड करणे (नियम ३०) (२०२६-२७)” हा सर्वाधिक वादाचा मुद्दा ठरला आहे.

ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष आत्माराम चौधरी यांनी कार्यकारी मंडळाची मुदत संपल्यानंतर स्वतंत्र निवडणूक प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना, वार्षिक सर्वसाधारण सभेतच थेट कार्यकारी मंडळ निवडण्याचा प्रयत्न हा बेकायदेशीर असून सभासदांच्या लोकशाही अधिकारांवर घाला असल्याचा आरोप केला आहे.

याच पार्श्वभूमीवर ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सभासदांच्या म्हणण्यानुसार, एकीकडे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे सांगितले जात असताना दुसरीकडे त्याच सर्वसाधारण सभेत कार्यकारी मंडळाची निवड करण्याचा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांच्या भूमिकेत विसंगती असल्याचा आरोप विरोधी सभासदांनी केला आहे. तसेच मोजक्या आणि आपल्या मर्जीतील सभासदांच्या उपस्थितीत कार्यकारी मंडळ निवडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे ग्रंथालयातील वातावरण तापले असून, दि. १२ जुलैची वार्षिक सर्वसाधारण सभा तात्काळ रद्द करावी, नियमबाह्य पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड रोखावी आणि धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखीखाली स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी सभासदांनी धर्मादाय आयुक्त, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. सन १८७२ मध्ये ‘व्हिक्टोरिया जुबिली लायब्ररी’ म्हणून स्थापन झालेल्या या संस्थेचे १९७२ मध्ये ‘पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय’ असे नामकरण करण्यात आले. तालुक्यातील हे एकमेव ‘अ’ वर्ग ग्रंथालय असून येथे २५० वार्षिक सभासद, ४५० आजीवन सभासद, सुमारे ४१ हजार ग्रंथ, ५० मासिके, १८ दैनिके आणि घरपोच मासिक सेवा उपलब्ध आहे. अशा ऐतिहासिक संस्थेतील निवडणूक व प्रशासनावरील वादामुळे संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे.

 

लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार

 

“वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी मंडळाची निवड करणे ही घटनेत तरतूद आहे. म्हणून सभेपुढील विषय पत्रिकेत विषय क्रमांक ९ घेतलेला आहे. मात्र वाचनालयाच्या मतदारांची प्रारूप यादी तयार झाली असून आम्हाला लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर करायचा आहे. त्यामुळे सभासदांनी गैरसमज करू नये.”

– दिलीप सोनवणे ( कोळी ), अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *