
चिमणपुरी–पिंपळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष बापू चौधरी बिनविरोध
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी–पिंपळे येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यामध्ये संतोष बापू चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित उपसरपंच संतोष बापू चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी शेतकी संघाचे अध्यक्ष संजय पुनाजी पाटील, निंबा बापू चौधरी, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ पुरुषोत्तम चौधरी, गोकुळ पाटील, माजी सरपंच भाऊसाहेब पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण निवड प्रक्रिया ग्रामविकास अधिकारी के. के. लंके यांच्या उपस्थितीत शांततेत व नियमानुसार पार पडली. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच वर्षा युवराज पाटील, नवनिर्वाचित उपसरपंच संतोष बापू चौधरी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी त्रिवेणी संगमाच्या संकल्पनेनुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असलेल्या वृक्षांची लागवड केली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छता, हरित ग्राम, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील विविध विकासकामे प्रभावीपणे राबवून चिमणपुरी–पिंपळे गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नवनिर्वाचित उपसरपंच संतोष बापू चौधरी यांनी ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. बिनविरोध निवडीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी संतोष बापू चौधरी यांचे स्वागत केले.

Leave a Reply